वरळी पोलीस कॅम्पमध्येही पोहचला कोरोना; क्वारंटाईन रहिवाशांच्या सोयीसुविधांसाठी आदित्य ठाकरेंच्या प्रशासनाला सूचना

वरळीतील परिस्थितीवर आदित्य ठाकरेंचं बारीक लक्ष

Waroli Police Camp

मुंबई : वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर आता वरळी पोलीस कॅम्पमध्येही कोरोना पोहचला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी इमारतीत दाखल झाले असून, त्यांनी इमारत सील केली आहे.

वरळी कोळीवाडा परिसरात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत कोळीवाडा भागात नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही, अशी माहिती स्थानिक शिवसेना नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली.

याशिवाय इथल्या १०८ रहिवाशांपैकी ८६ रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन रहिवाशांच्या सोयीसुविधांबाबत स्थानिक शिवसेना आमदार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. वरळीतील परिस्थितीवर आदित्य ठाकरेंचं बारीक लक्ष आहे. मोबाईल फोन आणि सोशल मीडियावर शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून ते माहिती घेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी पुढचा महिना अत्यंत महत्वाचा, जाणून घ्या कारण…

पोलीस कॅम्पात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. कॅम्पातील कोरोनाग्रस्ताची ड्युटी व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेसाठी होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. २० मार्चपासून त्याला ताप यायचा. तर काल रात्रीपासून पत्नीला ताप चढण्यास सुरुवात झाली. पत्नीला तत्काळ कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

या दाम्पत्याला दोन मुले आहेत. या मुलांना सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. तर मुलीला पोद्दार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कॅम्पातील या दाम्पत्यामुळे आता धाकधूक वाढली आहे.