कालवा फुटीनंतर आता तिवरे धरण फुटीलाही खेकड्यांवर खापर

सोलापूर : जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने अक्खे गाव धरणाच्या पाण्याने कवेत घेतले. २० जणांचा मृत्यू झाला तर आणखी अनेक ग्रामस्थ बेपत्ता आहेत. यामुळे मृतकांचा आकडा वाढू शकतो. मात्र धरणफुटीच्या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याला सावरासावर करीत चक्क जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी धरणफुटीला मूक प्राणी खेकड्यांना जबाबदार मानले आहे. माणवी दोष असताना आपला दोष मूक प्राण्यांवर थोपला जात असल्याची चर्चा आहे.

ही बातमी पण वाचा : हाच तो ‘खेकडा’ ज्याने तीवरे धरण फोडले – जितेंद्र आव्हाड

खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले, असे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचे मत असल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली. तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेनंतर आतापर्यंत २० जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत.

गत काही दिवसांपूर्वी पुण्यात मुठा नदीच्या कालव्याची भिंत फुटून झालेल्या अपघाताचे खापरही त्यावेळी उंदीर आणि खेकड्यांवरच फोडण्यात आले होते. त्या प्रकाराची पुनरावृत्ती यावेळी होताना दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : तीवरे धरण दुर्घटना: भाजपा-सेनेचे मंत्री स्वतःचं अपयश केव्हा मान्य करणार? – अजित पवार

धरणफुटीच्या घटनेला ४८ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? या प्रश्नावर ‘गुन्हा कोणावर दाखल करणार?’ असा उलटा प्रश्न तानाजी सावंतांनी केला. गुन्हा दाखल होण्यास २-३ महिने लागतील, अशी माहिती त्यांनी दिली. समिती नेमलेली असून चौकशी झाल्यावर आरोप निश्चित होतील, असे ते म्हणाले.

खेकड्याने भिंत पोखरल्याची थेअरी शिवसेना आमदाराला वाचवण्यासाठी नाही, मला जे ग्रामस्थांनी सांगितले, तेच मी सांगत असल्याची पुष्टीही तानाजी सावंत यांनी जोडली. ‘माझे आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे, अचानक पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे ही घटना घडली. हे धरण २००४ ला हॅन्डओव्हर झाल्याने चव्हाणांचा यात संबंध नाही’ असे म्हणत सावंतांनी त्यांची पाठराखण केली.

आमचा पक्ष सेन्सिटिव्ह असल्याने सगळ्यात आधी आम्ही पोहचलो. आम्ही कोणाला पाठीशी घालणार नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

सदानंद चव्हाण हेच तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधीपक्षाने केली. चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केल्याची कबुली महाजन यांनी दिली होती.

तिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येते. सण २००० साली या धरणांचे बांधकाम पूर्ण झाले. २० लाख क्युबिक मीटर पाणीसाठा मावेल एवढी या धरणाची क्षमता आहे. परंतु मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली. यावेळी अचानक पावसाचा जोर वाढला आणि पाणी साठाही वाढला यातच तडा गेल्या भिंती तुटल्या आणि धरण फुटले. यात अक्खे तिवरे गाव उध्वस्त झाले आहे.

ही बातमी पण वाचा : मृत्यूनंतरही आईचा ओढा मुलाकडेच!