नाराजीच्या ज्वालामुखीवर बसलेले उद्धव सरकार

CM Uddhav Thackeray-Ajit Pawar

badgeसत्तेसाठी आसुसलेले दोन्ही काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत बसायला तयार झाले तेव्हा काही भयंकर घडेल याची त्यांना कल्पना नसेल. पण घडते आहे. नाराजीच नव्हे तर घरातच तोडफोड सुरु झाली आहे. स्वतः उद्धव ठाकरे आणि अजितदादा पवार हे दोघे सोडले तर महाविकासआघाडीचे हे सरकार पूर्ण पाच वर्षे टाकावे असे कोणालाही वाटत नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचे स्फोट सुरू झाले आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी खुद्द अजितदादा पवार, उद्धव ठाकरे भिडले आहेत. नाराज आमदार शांतही होतील. पण त्यातून सरकारला स्थेर्य मिळताना दिसत नाही. तीन पक्षांचे सरकार असल्याने मर्यादा आहेत असे उद्धव म्हणत असले तरी ते समजून घेण्याची कोणाची मानसिकता आहे?

एका माणसाचा हुकूम चालतो त्या शिवसेनेतही नाराजी उघड होते याचा अर्थ गडबड आहे. ‘आम्ही नाराज नाही’ असे खा. संजय राऊत कितीही म्हणत असले तरी सरकारसाठी खिंड लढवणारे संजय राऊत शपथविधीला दांडी मारतात हे पुरेसे बोलके आहे. आपल्या कोट्यातल्या तीन जागा उद्धव यांनी तीन अपक्ष आमदारांना दिल्याने शिवसेनेतील इच्छुक आमदारांची गोची झाली आहे. रामदास कदम यांच्यापासून भास्कर जाधव यांच्यापर्यंत नाराजांची मोठी सेना आहे.

नागपूरचा पालकमंत्री कोण?

ह्या सरकारला कागदोपत्री १७० आमदारांचा पाठींबा आहे. पण मंत्रिमंडळ फक्त ४३ जणांचे करायचे आहे. म्हणजे १२७ आमदार नाराज होणारच. कारण प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे. पहिल्याच टर्मला आदित्य ठाकरेंना मंत्री करून उद्धव यांनी स्वतःला असंतोषाचे जनक बनवले आहे. आदित्यला थांबवता आले असते. बापबेट्याचे सरकार म्हणून टोमणे सुरू झाले आहेत. चांगले मंत्रिमंडळ दिले असे एकही आमदार उघड म्हणायला तयार नाही.

मंत्र्यांची यादी कोणी फायनल केली? ह्यावरून राष्ट्रवादीमध्ये युद्ध पेटले आहे. घराण्यांची तीच तीच जुनी खोड झालेली माणसे मंत्री म्हणून आली आहेत. पाच वर्षानंतर येणाऱ्या सत्तेत आमदारांना नवे चेहरे अपेक्षित होते. बीड जिल्ह्यातले प्रकाश सोळंके यांची समजूत काढण्यासाठी अजितदादांना दोन तास डोकेफोड करावी लागली. याहून मोठी खदखद काँग्रेसमध्ये आहे. संग्राम थोपटे यांना डावलले म्हणून त्यांच्या समर्थकांनी पुण्याचे काँग्रेस भवनमध्ये तोडफोड केली. कोल्हापूरमध्ये तीन मंत्री दिले. मात्र सोलापूरमधून कुणीही नाही म्हणून प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते संतप्त आहेत. अमित देशमुख यांना घेता आणि पृथ्वीराज चव्हाण यांना डावलता यात काय तर्क होता ते कळायला मार्ग नाही. अनेक आमदार आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. काँग्रेसला कमी आणि दुय्यम दर्जाची खाती मिळाली म्हणून सोनिया आणि खास करून राहुल गांधी ह्या सरकारवर पहिल्या दिवसापासून नाराज आहेत. काँग्रेसची सूत्रे ज्या दिवशी राहुल यांच्याकडे येतील त्या दिवशी उद्धव सरकारचा गेम झालेला असेल.