वाढदिवसानंतर आता स्वच्छता अभियान…

baramati mahanagar palika & Kiranraj Yadav

Shailendra Paranjapeबारामती नगरपालिका प्रशासनानं केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेमधे स्पर्धात्मकरीत्या सहभागी होण्याचं ठरवलंय. बारामती नगरपालिकेनं नववर्षापासून म्हणजे येत्या एक जानेवारीपासून स्वच्छतेच्या विरोधात वर्तन करणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. शहरात स्वच्छतेअभावी आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे एक जानेवारीपासून ही दंडाची कारवाई सुरू केली जाणार आहे, असे बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव (Kiranraj Yadav) यांनी सांगितले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी २०१४ मधे लोकसभा निवडणुकीनंतर पदाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतरच्या पहिल्याच व्हँलेन्टाइन डेला म्हणजे १४ फेब्रुवारी २०१५ला मोदीसाहेबांनी बारामतीला भेट दिली होती. आपलं बोट धरून राजकारणात आणणाऱ्या शरद पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढून बारामतीतल्या विकासाबद्दलही मोदी यांनी प्रशंसा केली होती. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीच्या विकासाबद्दल कौतुक करताना देशात शंभर बारामती विकसित करायला हव्यात, असं म्हटलं होतं.

वास्तविक सार्वजनिक स्वच्छता ही केवळ आणि केवळ सरकारची किंवा सरकारी यंत्रणांची जबाबदारी नसतेच. मुळात सरकार म्हणजे तरी काय, सरकार किंवा नगरपालिका म्हणजे समाजाचे सारे व्यवहार व्यवस्थितपणे होण्यासाठीची लोकशाहीतली यंत्रणा. त्यामुळं ज्या नागरिकांसाठी या यंत्रणा अस्तित्वात आल्या ते नागरिक परमोच्च महत्त्वाचे असतात आणि त्यामुळं नागरिकांनी स्वच्छता पाळली तर सरकारला किंवा अगदी देशाच्या पंतप्रधानाला स्वच्छता राखा, असं आवाहन करण्याची वेळ येणार नाही.

वास्तविक पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशव्यापी स्वच्छता मोहीम सुरू केली त्याला आता सहा वर्षं झाली आहेत. पण या वर्षी करोनानं देशालाच नाही तर संपूर्ण जगालाही ग्रासलं आणि त्यातून स्वच्छताविषयक जाणीव अधिक तीव्र झालीय. खरं तर सुरुवातीला बारामतीमधे रुग्णसंख्या अटोक्यात आणण्यासाठी राजस्थानमधला एक पँटर्न आणला गेला आणि नंतर त्याचं नामकरण बारामती पँटर्न असंही केलं गेलं. पुढे पुन्हा रुग्ण दिसू लागल्यावर तो पँटर्नही चर्चेतून हद्दपार झाला.

आता बारामतीमधे १ जानेवारीपासून सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारची अस्वच्छता करणाऱ्यांना विविध प्रकारचे दंड आकारले जाणार आहेत. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रुपये १५० तर रस्त्यावर कचरा टाकल्यास रुपये १८० दंड आकारला जाणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दोनशे रुपये दंड तर उघड्यावर लघुशंका केल्यास दोनशे रुपये आणि उघड्यावर शौच केल्यास पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.

बारामतीमधे सर्व व्यापारी आस्थापनांना दोन कचरा पेट्या दुकानांसमोर ठेवण्याची सक्ती केली जाणार आहे. जानेवारीपासून ही दंडात्मक कारवाई लागू केली जाणार असली तरी नोव्हेंबर महिन्यापासूनच त्याबद्दलची जनजागृती सुरू करण्यात आली आहे. बारामतीमधे सध्या ६० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

काल परवाच वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या शरद पवारसाहेबांचं बारामती हे गाव. त्यामुळे बारामती देशभर माहीत आहे. पुणे जिल्ह्यात तेरा तालुके आहेत पण स्वारगेटहून विनावाहक विनाथांबा एसटी बस या १३ तालुकांपैकी केवळ बारामतीलाच जाते. देशभर पंतप्रधानांनी पाच सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अभियानाची कडक अंमलबजावणी करण्याची इच्छा बारामती नगरपालिकेला होतेय हे सुचिन्हच म्हणावे लागेल.सर्वच तालुक्यात स्वच्छतेचा संदेश गेला आणि लोकांनी त्यात स्वतःहून सहभाग घेत किमान तंबाखू खाऊन पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणं जरी थांबवलं तरी बरीच स्व्छता होईल. बारामतीकडून स्वच्छतेसाठी दंडाचा धडा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतला तर ती खरी नववर्षाची सुरुवात होईल आणि पवारसाहेबांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला, असं म्हणता येईल.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER