संजय राऊतांनी अजित पवारांना स्टेपनी म्हटल्यानंतरही समर्थक गप्प का? : विनोद तावडे

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेपनी असल्याचे म्हटल्यानंतर अजित पवार यांचे समर्थक अजून गप्प का? असा सवाल माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. अजित पवार यांचा अवघ्या राजकीय जीवनात असा अपमान पाहिला नसल्याचे देखील तावडे यांनी म्हटले आहे. ते पिपंरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते.

खुर्चीचे मोल इतके असते का? असा सवाल उपस्थित करत विनोद तावडे म्हणाले की, संजय राऊत यांनी अजित पवार यांना स्टेपनी म्हटले तरी अजित पवार यांचे समर्थक गप्प कसे आहेत?पुढे ते म्हणाले की, माझ्या राजकीय आयुष्यात अजित पवार यांचा असा अपमान पाहिला नाही. खरच दादा स्टेपनी आहेत. की मेन व्हील आहेत, हे समर्थकांनी सांगावे. ज्यावेळी आमच्याकडे अजित पवार आले तेव्हा ते मेन व्हील घेऊन आले होते. पण त्याचा रिमोट कंट्रोल हा शरद पवार यांच्या हातात होता असेही तावडे म्हणाले.