सानियानंतर अंकिताने उंचावलीय विजेतेपदाची ट्रॉफी

Sania Mirza - Ankita Raina

सानिया मिर्झाने (Sania Mirza) मातृत्वामुळे विश्रांती घेतल्यापासून आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताच्या महिला टेनिसपटूला उल्लेखनीय यश मिळाले नव्हते. ती प्रतीक्षा अंकिता रैना हिने शुक्रवारी संपवली. तिने ऑस्ट्रेलियातील फिलीप आयलँड स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. वुमेन्स टेनिस असो.च्या (WTA) स्पर्धेतील तिचे हे पहिलेच अजिंक्यपद असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या यशासह ती वुमेन्स टेनिस असो.च्या दुहेरीच्या क्रमवारीत पहिल्यांदाचा टॉप-१०० मध्ये पोहचणार आहे. दुहेरीत सहा वेळच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या सानिया मिर्झाशिवाय टॉप -१०० मध्ये पोहोचलेली ती केवळ दुसरी भारतीय महिला आहे.

अंकिता रैना (Ankita Raina) आणि तिची रशियन साथीदार कामिला राखीमोव्हा (Kamilla Rakhimova) यांनी अंतिम सामन्यात रशियन जोडी ॲना ब्लिंकोव्हा व ॲनास्तेशिया पापोव्हा यांच्यावर २-६, ६-४, १०-७ असा विजय मिळवला. या विजेतेपदामुळे २८ वर्षीय अंकिता व तिची साथीदार यांना ८ हजार डॉलरचे बक्षीस मिळाले आणि क्रमवारीसाठी २८० गूण मिळाले. त्यामुळे अंकिता क्रमवारीतील ११५ व्या स्थानाहून आता ९४ व्या स्थानी पोहोचणार आहे.

अंकिता ही यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही दुहेरीच्या मेन ड्रॉमध्ये खेळली होती. आता तिचे क्रमवारीच्या एकेरीतील टॉप १०० मध्ये स्थान मिळवण्याचे ध्येय आहे.

विशेष म्हणजे अंकिता आणि कॅमिला ह्या प्रथमच खेळल्या. त्यांनी स्पर्धेच्या ड्राॅच्या फक्त २० मिनिटेच आधी जोडीने खेळायचा निर्णय घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER