राज ठाकरेंनंतर आता जयंत पाटीलही मास्कच्या विरोधात; मास्क काढून ठोकले भाषण

jayant Patil - Raj Thackeray - Maharastra today

पंढरपूर : राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयासाठी चंग बांधला आहे. त्यांनी कालपासूनच मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. पाटील यांनी प्रचार सभांवर भर दिला असून आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळतात; शिवाय मी मास्क वापरतच नाही, असेही प्रसारमाध्यमांना ठासून सांगतातही. अशातच पाटील यांनीही एका प्रचार सभेत चक्क मास्क काढून भाषण केलं. बरं, नुसता मास्क काढून पाटील थांबले नाहीत, तर मास्क काढण्याचं समर्थनही त्यांनी केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात शनिवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला जयंत पाटलांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो, असं म्हणत पाटील यांनी चक्क मास्क काढून भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली असताना पाटील यांनी मात्र मास्क काढण्याचं समर्थन केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, भाजप सरकारने कामगार कायदा करून कामगारांच्या रोजीरोटीवर टाच आणली आहे. गेल्या पाच वर्षांत देशात बेरोजगारीचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे, असं सांगतानाच राज्यात महाविकास आघाडी प्रामाणिकपणे काम करत आहे. परंतु, सरकारवर टीका करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. तसेच आघाडी सरकार कोणत्याही प्रकरणात अडचणीत येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button