मनसेच्या टोमण्यानंतर, गर्दी टाळून लोकल सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘फॉर्म्युला’

Aditya Thackeray-Local Train-Raj Thackeray

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी लोकल सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एक फॉर्म्युला सांगितला आहे. राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू असली आणि सर्व अद्योगधंदे सुरू असले तरी कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. हा धोका लक्षात घेऊनच आतापर्यंत लोकल ट्रेन (Local Train) सुरू करण्यात आली नाही, असे शासनाकडून वारंवार सांगण्यात येते.

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत लोकल धावत आहेत. त्यात सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे मुंबईत लोकल सुरू करण्यासाठीची मागणी आता जोर धरत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकल सुरू करण्यासंदर्भात एक योजना आखली आहे. सर्व कार्यालयं सुरू करण्याची परवानगी दिली तर गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग बळावू शकतो. यामुळे उपनगरीय रेल्वेवरील भार कमी करण्यासाठी कार्यालयाच्या भिन्न वेळा असल्याची गरज व्यक्त केली जात असताना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना युवा नेते आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणि लोकसंख्येचा विचार करता कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याचा विचार सुरू आहे.

कार्यालयातील कामासाठी पूर्ण २४ तासांचा वापर करता येतो का, यावर विचार सुरू आहे. यातून लोकल सेवेवर अतिरिक्त ताण येणार नाही. तसे झाले तर ऑक्टोबरपासून सर्वांसाठी लोक सुरू होऊ शकते. याबाबत उद्योजकांशीही संवाद सुरू असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान पश्चिम रेल्वेनं कोरोना काळात महिलांसाठी विशेष लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या महिलांसाठी पश्चिम रेल्वेवर महिला विशेष लोकल धावणार आहे. दोन लोकल फेऱ्या असतील.  पहिली महिला विशेष लोकल सकाळी विरार-चर्चगेट सकाळी ७.३५ वाजता तर संध्याकाळी ६.१० मिनिटांनी चर्चगेट-विरार अशी दुसरी लोकल असणार आहे.

मनसेचा टोमणा

त्यातच मनसेनेही (MNS) शिवसेनेला टोमणा हाणला आहे. राज्यात अनलॉक-५ सुरू होणार आहे.  मुख्यमंत्र्यांनी हॉटेल्स सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? असा सवाल संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? असा टोलाही संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल्स सुरु करण्याचे संकेत, कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का? मनसे नेत्याचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER