लवनंतर कुशही उतरणार निवडणुकीच्या मैदानात

बॉलिवूडमध्ये (Bollywood) शॉटगन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शत्रुघ्न सिन्हाचा (Shatrughan Sinha) मुलगा लव (Luv) यावेळी बिहारमध्ये काँग्रेसकडून (Congress) निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. परंतु त्याचा पराभव झाला. या पराभवामुळे लव खूपच नाराज झाला असल्याचे सांगितले जात आहे. पराभव तो अजूनही पचवू शकलेला नाही. मुलाच्या नाराजीवर बोलताना शत्रुघ्न सिन्हाने सांगितले, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय त्याचा होता. आम्ही त्यात कोणताही हस्तक्षेप करण्याच्या विचारात नव्हतो. मी नेहमी माझ्या तिन्ही मुलांसोबत असतो. मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो. पण त्यांनी माझ्याकडे सल्ला मागितला तरच मी त्यांना सल्ला देईन. मी त्यांच्या कामात कधीही हस्तक्षेप करीत नाही, असेही शत्रुघ्न सिन्हाने (Shatrughan Sinha) स्पष्ट केले.

बॉलिवूडनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु तेथे  निवडणुकीचे तिकीट न दिल्याने त्यांनी  काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु तेथेही त्यांची  डाळ शिजली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी  पत्नी पूनमला सपाच्या तिकिटावर उत्तरप्रदेशमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. परंतु त्यांचाही पराभव झाला होता.

आता लवनंतर कुशलाही राजकारणाच्या मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लव-कुश हे जुळे भाऊ असून त्यांचा जन्म ५ जून १९८३ ला झाला. लव हा कुशपेक्षा आठ मिनिटांनी लहान आहे. दोन्ही भावांमध्ये खूपच घट्ट नाते आहे. कुश मोठा असल्याने लव त्याला भैया म्हणून हाक मारतो. कुशचे २०१७ मध्ये लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव तरुणा आहे. लवचे मात्र अजून लग्न झालेले नाही. लवच्या मागोमाग आता कुश निवडणुकीच्या मैदानात उतरणार असला तरी तो बिहारमधून नव्हे तर उत्तरप्रदेशमधून आपली कारकीर्द घडवण्याचा विचार करीत आहे. २०२२ मध्ये त्याला सपाकडूनच निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. बाप शत्रुघ्न आणि भाऊ लव काँग्रेसमध्ये तर आई पूनम आणि मुलगा कुश सपामध्ये असे चित्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरात दिसणार आहे.

मुलांच्या राजकारण प्रवेशाबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, आगामी काळ हा तरुणाईचा आहे. पण मी असे म्हणत नाही की, वृद्ध नेत्यांनी निवृत्त व्हावे. कारण त्यांचे ज्ञान आणि अनुभव आजच्या राजकारणासाठी अत्यंत आवश्यक आहे. मी नेहमीच माझे वरिष्ठ गुरू  एल. के. अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. तरुणांनीही त्यांच्या आजूबाजूला असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. मात्र ‘जोश’बरोबरच त्यांना ‘होश’चीही आवश्यकता आहे, असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER