मोदींना ‘क्लीन चीट’ दिल्यानंतर विरोधकांनी माझा प्रचंड छळ केला; सीबीआयच्या माजी संचालकांचा आरोप

PM Modi

दिल्ली :  गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून माझा प्रचंड छळ करण्यात आला, असा आरोप सीबीआयचे माजी संचालक आर. के. राघवन यांनी केला आहे. राघवन यांचे ‘A Road Well Travelled’ आत्मचरित्र प्रकाशित झाले असून यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नरेंद्र मोदींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती, असे राघवन म्हणालेत. ते म्हणाले, यानंतर माझ्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांची बाजू घेतल्याचा आरोप झाला. माझ्या फोनवरील संभाषणांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. पण काहीही ठोस न मिळाल्याने त्यांची निराशा झाली. चौकशीच्या संदर्भात माहिती देताना राघवन यांनी म्हटले आहे की, २००२ गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींची सलग नऊ तास ‘मॅरेथॉन’ चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान नरेंद्र मोदींनी तपास अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या १०० पैकी एकही प्रश्न टाळला नाही. संपूर्ण चौकशीदरम्यान ते अत्यंत शांत होते. नऊ तासांच्या या चौकशीत त्यांनी साधा चहादेखील स्वीकारला नाही. तपासासाठी नरेंद्र मोदींनी गांधीनगरमधील एसआयटी कार्यालयात येण्याची तयारी दर्शवली.

सोबत पाण्याची बाटली आणली होती. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना एसआयटी चौकशीसाठी मोदी यांना एसआयटी कार्यालयात यावे लागेल असे कळवले होते. इतर कोणत्याही ठिकाणी ही चौकशी केली असती तर त्यातून चुकीचा संदेश गेला असता. मोदींना आमच्या निर्णयाचे महत्त्व समजले आणि ते एसआयटी कार्यालयात येण्यास तयार झाले, असे राघवन यांनी म्हटले आहे. राघवन यांनी मोदी आणि आपल्यामध्ये काही ठरलं होतं, असे आरोप होण्याची शक्यता असल्याने एसआयटी सदस्य अशोक मल्होत्रा यांना चौकशी करण्यास सांगितले होते. जवळपास नऊ तास मोदींची चौकशी सुरू होती. संपूर्ण चौकशीदरम्यान नरेंद्र मोदी शांत होते. रात्री उशिरापर्यंत ही मॅरेथॉन चौकशी सुरू होती, असे राघवन यांनी सांगितले आहे. मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर टाळले नाही.

उत्तर देताना ते दुर्लक्षितही केले नाहीत. मल्होत्रा यांनी त्यांना लंचसाठी ब्रेक हवा आहे का विचारले तेव्हा ते नाही म्हणालेत. मोदींनी सोबत  पाण्याची  बाटली आणली होती. चहा घेण्यासाठीही त्यांनी नकार दिला. राघवन यांनी मोदींच्या एनर्जीचे कौतुक केले. थोड्या वेळासाठी विश्रांती घेण्यासाठी मोदींना तयार करताना खूप प्रयत्न करावे लागले, अशी माहिती राघवन यांनी दिली. फेब्रुवारी २०१२ मध्ये एसटीआयकडून अंतिम अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये मोदींसह ६३ जणांना कोणताही पुरावा न सापडल्याने क्लीन चीट देण्यात आली. सुप्रीम कोर्टाने एसआयटीची स्थापना करून राघवन यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली होती. ते सीबीआयच्या प्रमुखपदी होते. राघवन यांनी याशिवाय बोफोर्स घोटाळा, २००० दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅच फिक्सिंग, चारा घोटाळा यासारख्या अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER