सातवेळा अपयशी ठरल्यावर मुंबई इंडियन्सने पाठलागात ओलांडला २०० चा टप्पा

mumbai indians - Maharashtra Today
mumbai indians - Maharashtra Today

आतापर्यंत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कधीही पाठलागात २०० वर धावा करून सामना जिंकलेला नव्हता आणि चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) २०० वर धावा केल्यावर एकही सामना गमावलेला नव्हता; पण कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे मुंबई इंडियन्सने शनिवारी दाखवून दिले आणि पाठलागात २१९ धावा करत एक अतिशय रोमहर्षक सामना जिंकला.

त्यामुळे धोनीच्या संघाने २०० वर धावा केलेले ११ सामने जिंकल्यानंतर पहिल्यांदाच अपयश पाहिले तर मुंबईने पहिल्यांदाच पाठलागात २०० धावांचा टप्पा ओलांडला. याच्याआधी २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांनी पाठलागात १९९ धावा केल्या होत्या; पण शनिवारी ६ बाद २१९ धावा करताना त्यांनी पहिल्यांदाच पाठलागात २०० ची वेस तर ओलांडलीच; शिवाय सुपर किंग्जविरुद्ध पाठलागात सर्वाधिक धावा करायचा किंग्ज इलेव्हन पंजाबचा २०१४ मधील २०६ धावांचा विक्रमही मोडला.

मुंबईचा हा यशस्वी पाठलाग आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वांत मोठा पाठलाग होता. यापेक्षा अधिक धावा विजयासाठी केवळ राजस्थान रॉयल्सने (२२४) केलेल्या आहेत.

आयपीएलमधील सर्वांत मोठे यशस्वी पाठलाग

२२४- राजस्थान वि. पंजाब, शारजा, २०२०
२१९- मुंबई वि चेन्नई, दिल्ली , २०२१
२१५- राजस्थान वि. डेक्क्न, हैदराबाद, २००८
२०९- दिल्ली वि. गुजरात, दिल्ली, २०१७

आता विजयांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले दोन जे मोठे विजय आहेत, त्या दोघांत वेस्ट इंडिजचे खेळाडूच महत्त्वाचे ठरले होते. शनिवारी विजयाचा शिल्पकार ठरलेल्या किरोन पोलार्डने पाचव्या क्रमांकावर खेळायला आल्यावर ३४ चेंडूंतच ८७ धावांची वादळी खेळी केली, त्याआधी गोलंदाजीत फाफ डू प्लेसीस व सुरेश रैनासारखे गडीसुद्धा बाद केले तर गेल्या वर्षी पंजाबचा संघ २ बाद २२३ असा धावांचा डोंगर रचूनही राजस्थानकडून पराभूत झाला होता. याचे कारण शेल्डन काॕट्रेलची गोलंदाजी ठरली होती. त्याच्याच एका षटकात राहुल तेवटीयाने तब्बल पाच षटकार लगावून सामना राजस्थानकडे खेचून नेला होता.

मुंबई इंडियन्सला २०० वर धावांचे लक्ष्य मिळालेला हा आठवा सामना होता. आधीचे सात सामने मुंबईने गमावलेले होते आणि मुंबईचा संघ २०० वर धावांचा पाठलाग करू शकत नाही असा समज झालेला होता; पण हा समज चुकीचा आहे हे सिद्ध करताना त्यांनी अखेरच्या १० षटकांतच १३८ धावा तडकावून काढल्या. आयपीएलमध्ये सामन्याच्या अखेरच्या १० षटकांत निघालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याचा आधीचा विक्रमही मुंबई इंडियन्सच्याच नावावर १३३ धावांसह होता ज्या त्यांनी २०१९ मध्ये मुंबईच्या सामन्यात किंग्ज इलेव्हनविरुद्ध केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button