मुख्यमंत्री अपघातातून थोडक्यात बचावल्यानंतर, आता राज्य सरकार खरेदी करणार ९० कोटींचे नवे हेलिकॉप्टर

मुंबई : राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत आज व्हीआयपिंसाठी ९० कोटींचे नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली. खरेदी प्रक्रिया एका वर्षाच्या आत पार पाडली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे हेलिकॉप्टर सर्वोत्कृष्ट असेल याची दक्षता घेण्यात येणार असून खरेदीकरिता जागतिक पातळीवर निविदा मागविण्यात येणार आहेत. सध्या राज्य सरकारच्या सेवेतील एक विमान सुस्थितीत आहे. परंतु निलंगा येथे दुर्घटनाग्रस्त झालेले एक हेलिकॉप्टर, तसेच बंद असलेले आणखी एक हेलिकॉप्टर आणि बंद असलेले एक विमान यांची लवकरच विक्री करण्यात येणार असल्याची माहिती आहे. लातूरमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुदैवाने बचावले होते. अलिबागमध्येही त्यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना टळली होती.

राज्य शासनाच्या मालकीच्या एका विमानाचा वापर २००९ मध्ये बंद करण्यात आला, तर हेलिकॉप्टरचा वापर २०१० मध्ये बंद करण्यात आला. त्यांची विक्री अद्याप होऊ शकलेली नाही. त्यांच्या, तसेच अलीकडे दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरच्या विक्रीचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल आणि त्यात फारच कमी किंमत येणार असेल, तर ती एखाद्या संग्रहालयाला भेटस्वरूप दिली जाऊ शकतात.

सध्या व्हीआयपींसाठी कार्यरत असलेले सेस्रा सायटेशन एक्सएलएस या विमानासाठी एक वैमानिक आणि सहवैमानिकाची नियुक्ती लवकरच करण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीने घेतला आहे.