राज्यपालांसोबतच्या चर्चेनंतर शरद पवार थेट मातोश्रीवर

Sharad Pawar - CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळातच राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. राजभवनावर नेत्यांचा राबता वाढताना पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या राजभवनावरील फेरी नंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या फे-या राजभवनावर वाढल्या आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात अस्थिर चित्र असल्याचे दिसत आहे.

काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्यानंतर भाजडपाचे नेते नारायण राणेही राज्यपालांना भेटले. शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर कालच संध्याकाळी ते थेट मातोश्रीवर पोहचले.

पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग; राज्यपाल आणि पवारांची भेट, चर्चेला उधाण

मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात तब्बल दीड-दोन तास चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. राज्यातील राजकीय घडोमोडी पाहता ठाकरे-पवार भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

राणेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे एकूणच नेत्यांच्या राजभवनावरील भेटीगाठी व त्यानंतर शरद पवार यांनी थेट मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेणे याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

कारण कोरोना संकट हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपाकडून वारंवार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कालची शरद पवार, ठाकर, राऊत यांची बैठक राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

एवढेच नाही, तर राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळातही मातोश्रीवर जाण्याचे टाळणारे पवार सोमवारी अचानक मातोश्रीवर गेले त्यामुळे अचानक घडणाऱ्या या घडामोडींमुळे राज्यात नेमके चाललंय काय? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER