बॅ. शेषराव वानखेडेनंतर विदर्भाला नाना पटोलेच्या रुपात दुसरा विधानसभा अध्यक्ष

नागपूर : विदर्भाला नाना पटोले यांच्या रुपात १९७२ नंतर रविवारी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षाचे पद मिळेल. आता अध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे निवडून येणे निश्चित आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी १६९ मतांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले.

विदर्भाच्या वाट्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद अनेकदा आले आहे. प्रमोद शेंडे, वसंत पुरके, सूर्यकांत डोंगरे, मोरेश्वर टेंमुर्डे हे विधानसभा उपाध्यक्ष राहिले आहेत. विदर्भातीलच रा.सू. गवई हे विधान परिषदेचे सभापती सुद्धा राहिले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्ष म्हणून बॅरि. शेषराव वानखेडे यांच्यानंतर नाना पटेले हे विदर्भातील दुसरे आमदार राहतील.
१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही १४ वी विधानसभा आहे. १९६० मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्याच विधानसभेचे अध्यक्ष सयाजी सिलम होते. १९६२ मध्ये त्र्यंबक भराडे अध्यक्ष बनले. १९६७ मध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली. ते अहमदनगरचे होते. यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी शिवराज पाटील, शरद दिघे, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ता नलावडे, अरुण गुजराथी, बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसे पाटील आणि हरिभाऊ बागडे यांनी सांभाळलेली आहे.

१९७२ मध्ये विदर्भाचे बॅरि. शेषराव वानखेडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले. आतापर्यंतचे विदर्भातील एकमेव आमदार होते. ते नागपूरचे तीन वर्षे महापौरही राहिलेत. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्षही होते.