बाळासाहेबांनंतर आता आनंद दिघेंचाही पुतळा बसवा; मनसेची आग्रही मागणी

Raj Thackeray - Anand Dighe - Balasaheb Thackeray

ठाणे : शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनाला दक्षिण मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे राजकीय दिग्गजांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेकडून (MNS) एक मोठी आणि आग्रही मागणी करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे उजवे हात म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anant Dighe) यांचा ठाण्यात पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, अशी मोठी मागणी मनसेने केली आहे.

या मागणीसाठी बुधवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. ठाणे शहराच्या मधोमध असलेल्या चिंतामणी चौकात आनंद दिघे यांचा हा पुतळा उभारण्यात यावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी करण्यात आली. त्यामुळे आता यावर ठाणे महानगरपालिका कुठली भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ठाणे शहराच्या जडणघडणीमध्ये आनंद दिघे यांचे मोठे योगदान आहे. ठाणे शहराच्या विकासासाठी केलेल्या अविश्रांत कामासाठी संपूर्ण ठाणे शहर दिघेसाहेबांच्या स्मृती विसरू शकत नाही. त्यामुळेच या शहराच्यावतीने आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ही मागणी केल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

आनंद दिघे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे. ठाणे शहरात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात आनंद दिघे यांचे मोठे योगदान आहे. त्या काळी ठाण्यात आनंद दिघे यांना मानणारा खूप मोठा वर्ग होता. त्यामुळे ठाणे म्हणजे आनंद दिघे हे समीकरण रूढ झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आपल्या वैयक्तिक करिष्म्याच्या जोरावर आनंद दिघे यांनी ठाणेकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचा प्रचंड दबदबा होता. आजही ठाण्यातील जुनी जाणती मंडळी आनंद दिघे यांचे नाव सन्मानाने घेतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER