मी केलेलं ‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेबांना नक्कीच आवडलं असतं – नितेश राणे

Nitesh Rane

सिंधुदुर्ग : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून अभियंत्यावर चिखलफेक करणा-या आमदार नितेश राणेंसह १९ जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी आपण केलेलं आंदोलन योग्यच होतं, असं म्हटलं. मी केलेलं ‘चिखलफेक’ आंदोलन कुणाला आवडो न आवडो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडलं असतं, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.

मी केलेलं आंदोलन इतर कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब हयात असते तर त्यांना नक्कीच आवडलं असतं. ते म्हटले असते, शाब्बास! नितेश तू योग्य काम केलंस, असं म्हणत नितेश यांनी गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. केसरकर यांनी आम्हाला जेलमध्ये बसतानाचे फोटो पाहण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी स्वप्न पाहावं. महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वप्न बघावे. त्यासाठी तुम्हाला जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. ‘अपना भी टाईम आयेगा’ हे लक्षात ठेवा, असा टोला नितेश यांनी केसरकर यांना उद्देशून लगावला.

ही बातमी पण वाचा : नितेश राणेंनी राडा केलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात

आम्ही काही गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीत. मी जोपर्यंत आमदार आहे, तोपर्यंत आम्ही लोकांशी बांधील आहोत. लोकांनी यासाठी आम्हाला निवडून दिले आहे. लोकांवर अन्याय होत असताना मी गप्प बसू शकत नाही. उद्यापासून किंबहुना आज या दिवसापासून माझी जबाबदारी सुरू झालेली आहे. कुणीही, कुठेही माझ्या लोकांवर अन्याय करत असेल तर सर्वांत पहिला अन्यायाच्या समोर जाणारा नितेश राणे असेल, असे ते म्हणाले.

आम्हाला शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. आंदोलन केलं ते योग्यच केलं, अशी सर्व जुन्या शिवसैनिकांची भावना होती. जे आंदोलन केलं ते लोकांसाठी होतं. आता रस्ता बनवायला सुरुवात केली आहे. यामुळे आम्ही या लढाईत जिंकलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. बरं झालं न्यायालयानं माझा प्रचार सोपा केला. दररविवारी कणकवलीला यायला मिळेल.

ही बातमी पण वाचा : आमदार नितेश राणे व 19 जणांना सशर्त जामीन