अमिताभ, अक्षय, अजयनंतर जॉन अब्राहमचा सिनेमाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर

अमिताभ, अक्षय, अजयनंतर जॉन अब्राहमचा सिनेमाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर

थिएटर सुरु झाल्याने रखडलेले सिनेमे प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण अनेक सिनेमे रांगेत असल्याने सगळ्यांनाच महत्वाच्या तारखा सिनेमाच्या रिलीजला मिळणार नसल्याने आणि एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर चार-पाच मोठे सिनेमे प्रदर्शित करणे शक्य नसल्याने काही निर्माते, नायक त्यांच्या नव्या सिनेमासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचाच मार्ग अवलंबत असल्याचे दिसत आहे. अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan) गुलाबो सिताबो (Gulabo Sitabo) हा पहिला मोठा हिंदी सिनेमा ओटीटीवर आला होता. त्यानंतर अक्षय कुमार (Akshay Kumar), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचे सिनेमेही ओटीटीवर आले. अजय देवगनचा (Ajay Devgan) सिनेमाही ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. आणि आता यात जॉन अब्राहम अभिनीत मल्टीस्टारर ‘मुंबई सागा’चा सिनेमाचाही समावेश होणार आहे. प्राईम व्हिडियोने हा सिनेमा मोठ्या रकमेला घेतला असून त्याच्या रिलीजची तारीख लवकरच घोषित केली जाणार आहे.

दिग्दर्शक संजय गुप्ता अंडरवर्ल्डवर सिनेमा बनवण्यात माहिर आहे. त्याचा मुंबई सागाही अंडरवर्ल्डवरच आधारित आहे. त्याच्या नेहमीच्या सिनेमाप्रमाणे हा सिनेमाही मल्टीस्टारर असून यात जॉन अब्राहमसोबत इमरान हाशमी, काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, विवेक ओबेरॉय, महेश मांजरेकर,सोनू सूद, रोहित रॉय, अमोल गुप्ते, समीर सोनी, गुलशन ग्रोव्हर, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, शाद रंधावा, पूजा हेगडे, श्रीया पिळगावकर अशी कलाकारांची फौज आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा संजय गुप्ताचा विचार होता. यासाठी त्याने अनेक वितरकांच्या भेटीही घेतल्या होत्या. वितरकांना सिनेमा आवडला होता पण कोणत्या तारखेला सिनेमा रिलीज करायचा हे ठरत नव्हते. सुट्ट्यांच्या काळात शाहरुख, सलमान, आमिर, अजय देवगऩ, अक्षय कुमार यांनी आपले सिनेमे रिलीज करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या मोठ्या नायकांसोबत सिनेमा रिलीज करून धोका पत्करण्यास वितरक तयार होत नव्हते. त्यामुळे संजय गुप्ताने शेवटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेझॉन प्राईमने न पाहाताच ‘लक्ष्मी’, ‘दुर्गामती’ आणि ‘कुली नंबर वन’ सिनेमे रिलीजसाठी घेतले आणि त्यांचे नुकसान झाले. प्रेक्षकांनी या सिनेमांना संपूर्णपणे नाकारले. यामुळे अॅमेझॉनला चांगलाच फटका बसला. आता तर कुली नंबर वन का घेतला याची अंतर्गत चौकशीही त्यांनी सुरु केली आहे. दुधाने पोळल्यामुळे अमेझॉनचे अधिकारी आता ताकही फुंकून पिऊ लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी मुंबई सागा सिनेमा पाहिला आणि त्यानंतर तो रिलीजसाठी घेतला. काही दिवसांपूर्वीच संजय गुप्ताने अमेझॉनच्या अधिकाऱ्यांसाठी त्याच्या सिनेमाच्या एका विशेष शोचे आयोजन केले होते. सिनेमा त्यांना आवडला त्यामुळेच त्यांनी सिनेमा रिलीजसाठी घेतला आहे. यासाठी किती रक्कम मोजली ते मात्र अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER