अफगाणिस्तानचा पाकिस्तानी दहशतवाद्यांवर ‘एअरस्ट्राइक’ १४ ठार

१८ नागरिकांचाही गेला बळी

Air Strike

काबूल : दोन वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याची कबुली पाकिस्तानच्या एका माजी राजनैतिक अधिकाऱ्याने नुकतीच दिली आहे. आता शनिवारी अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये १४ दहशतवादी मारले गेले आहेत. यात नऊ दहशतवादी पाकिस्तानी आणि तालिबानी असल्याची माहिती आहे.

या हल्ल्यात १८ अफगाण नागरिकही मारले गेले आहेत. मारले गेलेले सर्व एकाच कुटुंबातील लोक असल्याचे अफगाणिस्तानमधील गझनीमध्ये प्रांतीय परिषदेचे प्रमुख बाज मोहम्मद नासिर यांनी सांगितले.

हा हल्ला खशारोड जिल्ह्यातील मुनाजारी गावाला लक्ष्य करून करण्यात आला होता. ठार झालेल्यात आठ मुले, सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

निमरोज प्रांतामध्ये शनिवारी रात्री करण्यात आलेल्या एअरस्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, असा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. अफगाणिस्तान एअरफोर्सनेही एक पत्रक प्रसिद्ध करून शनिवारी तालिबानींच्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता.

दरम्यान, या हल्ल्यात ठार झालेल्यांचे नातेवाईक न्यायाची मागणी करत १८ शव घेऊन निमजोर प्रांताची राजधानी जारंज येथे पोहोचले आहेत.

संयुक्त राष्ट्रांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानमधील सुमारे सहा ते साडे सहा हजार दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेत. यापैकी अनेक दहशतवाद्यांचा संबंध ‘तहरीक ए तालिबान पाकिस्तान’शी आहे. संयुक्त राष्ट्रांनी हे दहशतवादी पाकिस्तान अफगाणिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले होते, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER