परकीय सत्तेच्या हस्तक्षेपास अफगाणिस्तानचा विरोध : अश्रफ घनी

Ashraf Ghani

अफगाणिस्तानमधील कारभारात कोणत्याही परकीय सत्तेच्या हस्तक्षेपास अफगाण सरकारने विरोध दर्शवला आहे. अफगाणिस्तानमधील सत्तारूढ सरकारला डावलून अमेरिका-तालिबान यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी हा विरोध व्यक्त केला. अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये लवकरच शांतता करार होण्याची शक्यता आहे, हे उल्लेखनीय.


काबूल : अफगाणिस्तानमधील कारभारात कोणत्याही परकीय सत्तेच्या हस्तक्षेपास अफगाण सरकारने विरोध दर्शवला आहे. अफगाणिस्तानमधील सत्तारूढ सरकारला डावलून अमेरिका-तालिबान यांच्यामध्ये होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी हा विरोध व्यक्त केला. अमेरिका आणि तालिबान यांच्यामध्ये लवकरच शांतता करार होण्याची शक्यता आहे, हे उल्लेखनीय.

घनी यांनी ईदच्या प्रार्थनेनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा करतांना सांगितले की ‘पुढील महिन्यात होणारी अध्यक्षीय निवडणुक महत्त्वाची आहे. दीर्घकालीन युद्धानंतर येथील जनता आपला अध्यक्ष निवडेल. कुठलाही निर्णय घेण्यासाठी आवश्यक तो जनादेश मिळेल. अफगाणिस्तानचे भवितव्य या ठिकाणीच ठरेल. आमच्या कारभारात बाहेरील कुणीही हस्तक्षेप करू नये.’

दरम्यान, अफगाणिस्तानमधील निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे राजदूत झल्मय खालिलजाद हे तालिबानसोबतचा शांतता करार मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहेत. कतार येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात बोलणी सुरू आहे व यात अमेरिका आणि नाटोचे सैन्य २० हजारांनी कमी करण्याच्या निर्णयावर मतैक्य होण्याची शक्यता आहे. त्याबदल्यात अफगाणिस्तान हा पुन्हा दहशतवाद्यांचा अड्डा बनणार नाही, अशी हमी अफगाणिस्तानला द्यावी लागण्याची शक्यता आहे.

कतारमधील तालिबान प्रवक्ता सुहैल शाहीन याने सांगितले, की चर्चेच्या फेऱ्यांनंतर (अमेरिकेसोबत) करार अपेक्षित आहे. पुढील ईद अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक सत्तेखाली होईल, अशी अपेक्षा आहे. अफगाणिस्तानात कुठलीही परकीय फौज नसेल आणि या ठिकाणी शांतता कायमस्वरूपी नांदेल.’ तालिबानने विद्यमान सरकारची अमेरिकेचे बाहुले म्हणून हेटाळणी केली आहे व या सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला आहे.