अद्वैतला वाटते या गोष्टीची भीती

Adwait Dadarkar

अभिनयात पुरेसा अनुभव गाठीशी जमला की, कलाकार मंडळी दिग्दर्शनाकडे वळतात; पण अनेकदा हाच प्रवास उलट्या दिशेने करणारेही या क्षेत्रात तितकेच यशस्वी होतात आणि लक्ष वेधून घेतात. यापैकीच एक म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar). सध्या ‘अगबाई सूनबाई’ या मालिकेत बबड्याच्या रूपात अद्वैत छोट्या पडद्यावर आला आहे. मात्र यावेळी त्याचं कौतुक नव्हे तर त्याला ट्रोल केलं जातं आहे ते बबड्याच्या नव्या लूकमुळेच. अनेक जणांना बबड्याचा नवा लूक आवडला नसल्यानेच ही भूमिका करणाऱ्या अद्वैतवर टीकेचा वर्षाव सध्या सोशल मीडियात सुरू आहे. याच निमित्ताने सोशल मीडियावर (Social Media) ऑनस्क्रीन आलेल्या अद्वैतने एक असे विधान केले की, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अद्वैत म्हणतो की, मला दिग्दर्शक म्हणून नव्हे तर अभिनेता म्हणून जास्त भीती वाटते. एकामागून एक गाजलेल्या मालिका करूनही मला अभिनयाची भीती वाटते, या वाक्याने त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. अद्वैतने याही गोष्टीचा खुलासा केला आहे. तो म्हणतो की, अभिनेता म्हणून नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाव्यात असे प्रत्येक कलाकाराला वाटत असते. त्यातही मी माणूस म्हणून जसा आहे त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची भूमिका जर मला कलाकार म्हणून करायला मिळाली तर ते माझ्यासाठी जास्त आव्हान असतं.

दिग्दर्शनामध्ये चेंडू माझ्या हातात असतो. मला ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे मी ती कलाकृती मांडत असतो. त्यामुळे मी माझ्या मनाचा राजा असतो. तिथे फारसं आव्हान नसतं; पण अभिनेता म्हणून माझ्या वाट्याला कुठली भूमिका येते ? त्या भूमिकेचे कंगोरे काय आहे ? अनेकदा अशा भूमिका असतात की ज्या आपल्या व्यक्तिगत स्वभावाच्या खूप विरुद्ध स्वभावाच्या असतात आणि अभिनेता म्हणून तिथे कस लागत असतो. नुकतीच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका संपली आणि या मालिकेत मी ‘सौमित्र’ ही भूमिका करत होतो. पण आता ‘अगंबाई सूनबाई’ या मालिकेत मी बबड्या नावाची भूमिका करत आहे. या दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा खूप वेगळ्या आहेत आणि म्हणूनच अभिनेता म्हणून मला ही सतत भीती वाटत असते की, ज्या दृष्टिकोनातून लेखकाने ते पात्र लिहिले आहे त्या पात्राला कलाकार म्हणून मला न्याय देता येईल का नाही ही रुखरुख माझ्या मनात सतत असते आणि त्यामुळेच मला अभिनय करण्याची जास्त भीती वाटते. यापूर्वीच्या मालिकेत मी जो सौमित्र साकारला होता तो माझ्या स्वभावाशी जुळणारा होता. पण बबड्या ही व्यक्तिरेखा माझ्या स्वभावाच्या खूप वेगळी आहे . ही मालिका सुरू होऊन या मालिकेचे प्रोमोज झळकायला लागले तेव्हापासूनच या मालिकेतील माझा लूक अनेकांना आवडला नसल्याच्या प्रतिक्रिया मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाल्या. कलाकार म्हणून ट्रोलिंगकडे कितीही लक्ष द्यायचं नाही असं म्हटलं तरी त्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असतात. प्रेक्षकांच्या मनात नेमकं काय आहे हेच तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रतिक्रिया उमटत असतात त्यातून समोर येत असतं. मी नव्याने साकारत असलेला बबड्या हा वेगळा आहे. त्याचा लूक वेगळा आहे. त्याचं वागणं वेगळं आहे. त्यावरूनच माझ्यावर निशाणा साधण्यात आला. इथेच अभिनेता म्हणून मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. मी जसा नाही ते अभिनयातून दाखवणं हे चॅलेंज आहे आणि मला अभिनेता म्हणून अशा चॅलेंजसची भीती वाटते, असेही अद्वैत म्हणतो.

अभिनेता अद्वैत दादरकर हे नाव ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधला सौमित्र म्हणून जितकं प्रसिद्ध झालं तितकच सध्या ‘अगबाई सूनबाई’ या मालिकेतील बबड्या म्हणून ट्रोल होत आहे. तिकडे माझ्या नवऱ्याची बायको ऑफ कॅमेरा झाली आणि इकडे अगबाई सूनबाई ही मालिका नव्या रूपात आली. या दोन्ही मालिकांशी जोडलेले एक नाव म्हणजे अर्थात अद्वैत दादरकर. सध्या अद्वैतला नेटकरी प्रचंड ट्रोल करत आहेत. यावरूनच अद्वैतने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.

अद्वैतने अभिनयाकडे वळण्याआधी अनेक वाटा धुंडाळून पाहिल्या आहेत हे खूप कमी जणांना माहीत आहे. अगदी सुरुवातीला अद्वैतच्या डोक्यात क्रिकेटचे वेड आले. सरावासाठी साहित्याचा लवाजमा घेऊन तो मैदानावर आठवडाभर रमला; पण हे काही आपल्याला जमणार नाही हे कळल्यावर तंबूत परतला. मग त्याला नाटक खुणावू लागले. पण नाटकातून काढल्यानंतर तो खट्टू झाला आणि विंगेत गेला. त्याचा भाऊ छान गायचा. त्याला पाहून अद्वैतला वाटले की आपण गायक बनूया. पण तोही सूर काही लागला नाही. वाद्य वाजवायला यायला हवं असं वाटल्याने अद्वैतने कीबोर्ड शिकायला सुरुवात केली. सहा महिन्यांत त्याचे आणि कीबोर्ड वादनाच्या तारा दुरावल्या. त्यानंतर एका शिबिरात नाटक, अभिनय याचे संस्कार झाले तेव्हा मात्र नाटक हाच आपला प्रांत आहे हे त्याला कळून चुकले. नाटक लिहायला जमलं, दिग्दर्शनाचं तंत्र समजलं. तेव्हापासून अद्वैत आणि नाटक यांची गट्टी जमली. अभिनय, लेखन, दिग्दर्शन असा तिहेरी प्रवास करत अद्वैतची वाटचाल मस्त सुरू झाली.

मुंबईच्या दादरमध्ये बालपण गेलेल्या अद्वैतचे शालेय शिक्षण बालमोहन तर महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल कॉलेजमध्ये झाले. रूपारेलमध्ये नाटकाचे ग्रुप असल्याने त्याच्यातील नाट्यकलाकार बहरला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन तसेच दादा एक गुड न्यूज आहे, गोष्ट तशी गमतीची, प्रेमाच्या गावा जावे या नाटकांचे दिग्दर्शन अद्वैतने केले आहे. तर ‘तू माझा सांगाती’ मालिकेतील नारद, ‘शुभंकरोती’ मालिकेतील शशांकच्या भूमिकेतूनही तो भेटला. सौमित्र बनहट्टी बनून राधिकाच्या आयुष्यात सुख आणणाऱ्या सौमित्रमधून तो फेमस झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER