
- हायकोर्टातील प्रत्यक्ष सुनावणीचा अनुभव
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या डिसेंबरपासून मुंबईत प्रकरणांची प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचे काम सुरु केले असले तरी वकील मंडळी ‘सोशल डिस्टसिंग’ न पाळता अनावश्यक गर्दी करत असल्याने त्यांना शिस्त पाळण्याची ताकीद देण्याची वेळ न्यायाधीशांवर येत आहे. फौजदारी प्रकरणांची सुनावणी करणार्या न्या. संभाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने सोमवारी असा अनुभव आल्यानंतर नियम पाळले नाहीत तर एकाही प्रकरणाची सुनावणी न घेण्याची व ‘प्रत्यक्ष सुनावणी’ बंद करण्याची समज वकिलांना दिली.
न्यायमूर्तींच्या निर्देशांवरून न्यायालयाच्या प्रशासनाने आता या खंडपीठापुढे पूर्वीप्रमाणे १०० प्रकरणे सुनावणीसाठी न लावता फक्त ६० प्रकरणे लावली जातील, असी नोचीस जारी केली आहे. या प्रकरणांच्या सुनावणीसाठीही निश्चित वेळ दिली जाईल. तरी वकिलांनी त्यांना ठरवून दिलेल्या वेळेलाच कोर्टात यावे व आधी येऊन किंवा नंतर येऊन कोर्टात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात न्या. गौतम पटेल यांनीही गर्दी करणार्या वकिलांना अशीच तंबी दिली होती. या शिवाय गेल्या आठवड्यात एका वकिलाने न्यायालयात युक्तिवाद करताना तोंडाला लावलेला मास्क काढल्यावर न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या वकिलाचे प्रकरण बोर्डावरून काढून टाकले हाते.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला