गुणकारी गूळ!

Jaggery

गोड पदार्थ करताना साखर (Sugar) किंवा गूळ (Jaggery) यांचा वापर आपण करतो. आहारात साखरेपेक्षाही गुळाला महत्त्व देण्यात येते. गुळाला आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते बघूया.

लहानपणी गूळ-शेंगदाणे, गूळ -फुटाणे असा खाऊ असायचा. मधल्या वेळेत खाण्याकरिता हे पदार्थ चालायचे. गूळ -शेंगदाण्याची चिक्की, राजगिरा चुरमुऱ्याचे लाडू हे सहसा गुळाचेच. मकर संक्रांतीत तिळाचा संयोग गुळाशीच. तीळ-गुळाचा लाडू असो अथवा चिक्की या सर्व पदार्थात गूळच वापरला जातो. त्याशिवाय मजा नाही. उसाचा रस स्वच्छ करून शिजवून त्याला गुळामध्ये रूपांतरित होणाऱ्या गुळाचे गुण आयुर्वेदात सांगितले आहेत. कोणत्याही जातीच्या उसाचा गूळ हा कृमी (जंत) तयार करणारा, रक्त वाढविणारा, मांसमेद वाढविणारा आहे.

ALL ABOUT JAGGERY — Jasmine Hemsley

नवीन गुळापेक्षा जुना गूळ हा जास्त चांगला पथ्यकर व हृदयाला हितकर सांगितला आहे. पचायला हलका आहे. नवीन गूळ कफ वाढविणारा व जठराग्नी मंद करणारा आहे.

 • गूळ मूत्रशोधन करणारा सांगितला आहे. म्हणजे मूत्रविकारांवर कार्य करतो. मूत्र प्रवृत्ती व्यवस्थित न होणे, अडथळा येणे अशा विकारांवर गूळ उपयोगी आहे.
 • गूळ मांस वाढविणारा आहे. त्यामुळे गूळ -शेंगदाणे, गूळ-फुटाणे हे रक्त, मांस व बल वाढविण्याचे काम करतात.
 • पाचन चांगले करणारे असल्याने आव पडणे, बद्धकोष्ठता किंवा मल प्रवर्तनाकरिता कुंथणे अशा तक्रारींवर गूळ फायदेशीर ठरतो.
 • गूळ मळाला बाहेर काढण्याचे काम करतो. तो खाल्ल्याने पोट साफ होते. म्हणूनच पाचन मंद असणाऱ्या व्यक्तींना गूळ खाल्ल्याने पातळ संडास होऊ
  शकते.
 • मूळव्याधीमध्ये डाळिंबाचा रस, गूळ, सुंठ, ओवा मिश्रण पाचन करणारे आहे.
 • गूळ रक्तशुद्धीकर रक्त वाढविणारा आहे. म्हणूनच गूळ घालून पोळी, गुळाची चिक्की खाल्ल्यास रक्त प्रमाण वाढते.
 • श्रीखंड बनविताना दह्यात साखरेऐवजी गूळ घातल्यास ते जास्त पौष्टिक, तृप्ती करणारे, हृद्य असे सांगितले आहे.
 • गुळ व जिरे एकत्र करून खाल्ल्यास मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी कमी होते.
 • जंत झाल्याने पोट दुखत असेल तर गुळाचा खडा खावा व नंतर पोट साफ करणारे औषध दिल्याने जंत बाहेर पडतात.
 • सुंठ, गूळ एकत्र घेतल्याने वातशमन होते.
 • थकवा कमी करणाऱ्याकरिता गूळपाणी उत्तम सरबत आहे.
 • उचकी लागल्यास सुंठ, गूळ चाटण फायदेशीर आहे.

गूळ हे उष्ण आहे. त्यामुळे रक्ताचे विकार असणारे नाक फुटणे किंवा गुदभागातून रक्त निघण्याचा त्रास असणाऱ्यांनी गूळ जास्त खाऊ नये. गूळ कृमी जंत उत्पन्न करणारा आहे त्यामुळे अति गुळाचे पदार्थ, गोड पदार्थ जंताचा त्रास असणाऱ्यांनी घेऊ नये. अति प्रमाणात गूळ किंवा गुळाचे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढणे, डायबिटीज होऊ शकतो. साखरेपेक्षा गूळ हा जास्त पौष्टिक असतो. गूळ अनेक औषधी तयार करताना वापरतात. आसव अरिष्टांमध्ये गुळाचाच वापर होतो. उदा. अभयारिष्ट.

अनेमिया कामला श्वास कास इ. व्याधींवर औषध गुळामध्ये घेतल्यास औषधाचा प्रभाव वाढतो. म्हणून अनुपान स्वरूपात गूळ घेण्याचा सल्ला देतात.

गूळ आहारात नक्की असावा; परंतु त्याचे गुण-अवगुण मात्र यांचा विचार करूनच!

ही बातमी पण वाचा : जंत – लहान मुलांना त्रास देणारा आजार

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER