बुलढाणा अकोलामध्ये ॲडव्हान्टेज भाजप

Buldhana-Akola Vidhan Sabha

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात गेल्या काही वर्षात भाजपने यशस्वी शिरकाव केला आणि आज खामगावपासून आमगावपर्यंतचा विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही गडांना पश्चिम विदर्भात हादरे बसतील अशी स्थिती दिसत आहे. येत्या आठ दिवसात पक्ष संघटना आणि नेतृत्वाने योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली तर अगदी शेवटच्या टप्प्यात या हादऱ्यांपासून पक्षाचे उमेदवार वाचू शकतील.

बुलढाणा जिल्ह्यात मलकापूरमध्ये भाजपचे दिग्गज उमेदवार आणि विद्यमान आमदार चैनसुख संचेती यावेळी अडचणीत आहेत. काँग्रेसचे राजेश एकडे यांनी त्यांना मोठे आव्हान दिले आहे. गेली वीस-पंचवीस वर्षे नांदुरा नगरपालिका ताब्यात ठेवणारे एकडे तीन महिन्यापूर्वीपर्यंत भाजपमध्ये होते पण, संचेती यांच्यासमोर आपल्याला पक्ष उमेदवारी देणार नाही हे लक्षात आल्यानंतर ते काँग्रेसवासी झाले आणि आज संचेती यांच्यासाठी ते मोठीच डोकेदुखी बनले आहेत. एकडे राजकारणात ज्यांना गुरु मानतात असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी लेवा पाटील समाजाची मते एकडे यांच्या बाजूने फिरवली तर संचेती अधिकच अडचणीत येतील. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. याला कारण शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध भाजपचे योगेंद्र गोडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यातच वर्षानुवर्षे शिवसेनेत असलेले तीन वेळचे आमदार विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचा रस्ता धरला आहे. त्यामुळे मत विभाजनाचा फायदा सपकाळ यांना मोठ्या प्रमाणात होईल असे बोलले जात आहे.

जळगाव जामोद, खामगाव या दोन मतदारसंघांमध्ये भाजपचे अनुक्रमे डॉ. संजय कुटे, आकाश फुंडकर विजय होतील अशी स्थिती आहे. चिखलीमध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे राहुल बोंद्रे विरुद्ध भाजपच्या श्वेता महाले यांच्यात जबरदस्त लढत आहे. महाले यांना ॲडव्हान्टेज दिसते.  सिंदखेडराजामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात चुरस आहे. शिंगणे यांचे जवळचे नातेवाईक आणि बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला जिल्ह्यातील पाचपैकी पाचही जगा जिंकण्याचा निर्धार भाजप-शिवसेना युतीने केला असला तरी अकोट व बाळापुरमध्ये युतीची सत्वपरीक्षा आहे. अकोला शहर व ग्रामीण दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा सहज विजय होईल.तेथील गोवर्धन शर्मा आणि रणधीर सावरकर पुन्हा विधानसभेत पोहोचतील अशी स्थिती आहे. मुर्तीजापुरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे सध्या येत असलेल्या काही अडचणींवर शेवटच्या टप्प्यात निश्चितपणे मात करतील असे दिसते. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर अनिल गावंडे आणि काँग्रेसचे संजय बोडखे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

अकोला जिल्ह्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे नगर विकास राज्यमंतत्री डॉ.रणजीत पाटील तर बुलढाणा जिल्ह्यात कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.