त्यांना बैलगाडी लक्षात आहे हे कौतुकास्पद, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut - Devendra Fadnavis

मुंबई :- त्यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब अत्यंत कौतुकाची बाब आहे, असा खरमरीत टोला शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात गाडीभर पुरावे आणणार अशी घोषणा काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीचं (NCP) आघाडीचं सरकार असताना फडणवीस यांनी केली होती. आज कृषी कायद्यांचं महत्त्व सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून बैलगाडी मोर्चा काढला आणि त्यानंतर त्यांनी हे कायदे शेतकरी हिताचे कसे आहेत हे देखील आपल्या भाषणात सांगितलं.

यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही कौतुकाची बाब आहे. मात्र नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ असलेल्या बैलांचंही पोषण करण्याची हिंमत उरलेली नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.

एवढंच नाही तर राज्य सरकारकडे पैसे आहेत. ९० कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यांवर कसे खर्च केले जातात? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. तसंच महाविकास आघाडी सरकार हे ढोंगी आहे असाही आरोप त्यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांना अशाप्रकारच्या भूमिका घ्याव्या लागतात. ते महाविकास आघाडीवर जेवढी टीका करतील तेवढी महाविकास आघाडी मजबूत होत जाईल.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त जे भाषण केलं त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या. या घोषणांचं स्वागतच आहे असंही संजय राऊत म्हणाले. असं असलं तरीही फक्त मोदींच्या काळातच शेतकऱ्यांचा फायदा होऊ लागला असं म्हणता येणार नाही. मागील पाच वर्षांमध्येच शेतकऱ्यांचा फायदा झाला, असं जर ते म्हणत असतील. तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या अगोदर दहा वर्षे शरद पवार कृषी मंत्री होते. काही काळ राजनाथ सिंह कृषी मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. मोरारजी देसाई पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते. हा कृषी प्रधान देश आहे असा जो काही मागील ७० वर्षांपासून आपण डंका पिटतोय त्याचं श्रेय नक्की मग कोणाला द्यायचं?”

आपल्या देशाला कृषीप्रधान अशी ओळख मिळाली आहे कारण सुरुवातीपासूनच आपला देश शेतकऱ्यांना महत्त्व देत आला आहे. भाजपाकडून मात्र कडाक्याच्या थंडीत मागचे तीस दिवस आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातं आहे ही बाब योग्य नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

ही बातमी पण वाचा : राजा ‘उधार’ झाला अन् हाती भोपाळ दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER