मतमोजणीसाठी लातूरमध्ये प्रशासकीय तयारीच्या जोरबैठका

vote counting in latur

लातूर/प्रतिनिधी :- लोकसभा निवडणूकांची मतमोजणी येत्या २३ तारखेला होणार असून त्याच्या तयारीच्या बैठकांसाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी सध्या जोर लावत आहेत. पोलिस बंदोबस्त, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे नियोजन यामध्ये प्रशासन व्यस्त आहे. दुसरीकडे ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा दिला जात आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान दुसऱ्या टप्प्यात पार पडले. त्यानंतर राजकीय वातावरण थंड झाले. मधला काही काळ प्रशासनाच्या पातळीवरही निवडणूकीच्या अनुषंगाने थोडासा विश्रांतीचा काळ होता. ईव्हीएम मशीन्स स्ट्राँग रूमध्ये सील करून ठेवल्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारीही थोडेसे निवांत झाले होते. परंतू गुरूवारपासून पुन्हा एकदा निवडणूकीच्या मतमोजणीची तयारी जोरदारपणे सुरू झाली आहे.  गुरूवारी या अनुषंगाने वरीष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यावेळी  जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत, महापालिका आयुक्त एम.डी.सिंह, उप जिल्हा

निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी सुनील यादव, प्रदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकारी व त्यांच्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने दिलेली जबाबदारीची  माहिती करुन घ्यावी. त्याबाबतच्या शंकाचे निरसन करुन घ्यावे. व आपली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी.  मतमोजणी केंद्रात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी –कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाही. त्याप्रमाणेच मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्याशिवाय कोणीही मोबाईल वापरण्यास आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिबंध असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. मतमोजणीचा फेरीनिहाय निकाल निवडणूक निर्णय अधिकारी हेच जाहीर करतील. त्या व्यतिरिक्त मतमोजणी केंद्रातून कोणीही अनाधिकृतपणे माहिती देणार नाहीत.   टपाली मतपत्रिका मोजणी पथक, मतमोजणी मनुष्यबळ व्यवस्थापन पथक, साहित्य व्यवस्थापन पथक, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहाय्यक पथक, सिलींग पथक, मतमोजणी समन्वय व अहवाल संकलन पथकां आढावा घेण्यात आला. त्याप्रमाणेच मतमोजणीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, इंटरनेट सुविधा, मिडिया कक्ष, या बाबत ही माहिती घेऊन संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी चोखपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.