पुढील आठवड्यापासून महापालिकेत प्रशासक राज

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर :  कोल्हापूर महापालिकेची मुदत १५ नोव्हेंबरला संपत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. दिवाळी सुट्टीमुळे कामकाजासाठी मिळणारे अवघे चार दिवस, जोडून दिवाळीच्या सुट्या यामुळे महापालिका सभागृहाची मुदत संपल्यात जमा आहे. सोमवारपासून महापालिकेत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे या प्रशासक म्हणून कारभार पाहणार आहेत.

गेल्या पाच वर्षांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी, त्यांना सामोरे जाणारी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडी असे चित्र विद्यमान सभागृहात उभे राहिले. तिन्ही पक्षांची आघाडी असल्याने सर्व सदस्यांना न्याय देणे नेत्यांना जमले नसते. त्यामुळे महापौर, स्थायी सभापती अशा पदांचे तुकडे पाडावे लागले. कॉंग्रेसकडून अश्‍विनी रामाणे, स्वाती यवलुजे, शोभा बोंद्रे, राष्ट्रवादीकडून हसीना फरास, सरिता मोरे, माधुरी गवंडी, ऍड. सूरमंजिरी लाटकर यांना संधी महापौर पदाची मिळाली. विद्यमान महापौर निलोफर आजरेकर या अपक्ष निवडून आल्या होत्या. बिनशर्त कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसने त्यांना शेवटच्या टप्प्यात संधी दिली. उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम यांचे महापौरपदाचे स्वप्न अपुरे राहिले. प्रारंभी राज्यात भाजपचे सरकार, गेल्या वर्षी अस्तित्वात आलेले महाविकास आघाडीचे सरकार अशा दोन सरकारच्या कार्यकाळातून सभागृहाची वाटचाल झाली.

पक्षाच्या चिन्हावर निवडून येणाऱ्यांची संख्या अधिक राहिली. भाजपचे आशिष ढवळे हे राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक ऐनवेळी फुटल्याने स्थायी समितीचे सभापती झाले. दोन्ही नगरसेवकांचे पद सध्या रद्द झाले आहे. तेथे पोटनिवडणूक होऊन जागा राखण्यात दोन्ही कॉंग्रेसला यश मिळाले. पाच वर्षांत उत्पन्नाचे मार्ग मर्यादित राहिले. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेस तसेच शिवसेनेची सत्ता येऊन शहरवासीयांच्या हाताला काही लागले नाही. तेच रस्ते, वाहतुकीची तीच समस्या हे चित्र काही बदलले नाही. किमान पुढील तीन महिने कांदबरी बलकवडे यांचा प्रशासकांचा कार्यकाळ असेल. डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येते की काय, याकडे लक्ष लागून आहे. तसे न झाल्यास मार्चमध्ये नव्या सभागृहासाठी मतदान होऊ शकते. पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची गणिते महापालिकेच्या संख्याबळात अडकली आहेत. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेस आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. पालकमंत्री सतेज पाटील हे विधानपरिषद लढवणार असल्याने महापालिका निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER