गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी : मुख्यमंत्री

Cm On crowd

मुंबई :- पोहरादेवीयेथील झालेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरोना काळात अशा रीतीने नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशिम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत अहवाल देण्यास सांगण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला. मुंबई महानगर क्षेत्रातील मनपा आयुक्तांशी संसर्ग रोखण्यासंदर्भात करत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, “गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळेदेखील नियमांचे पालन करत होते. आता ‘मिशन बिगिन अगेन’मध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. परवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही, हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत, पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, हे सर्वानी लक्षात ठेवावे.”

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आवाहन पण मित्र पक्ष काँग्रेसनेच केले दुर्लक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER