आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्याची भाजपची तयारी?

Aditya Thackeray

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या भरघोस यशानंतर विधानसभेतही अशीच दमदार कामगिरी दिसून येणार, असा दावा युतीच्या नेत्यांनी केला आहे. युतीची सत्ता आल्यास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी गुरुवारपासून सुरू केलेली राज्यव्यापी जन आशीर्वाद यात्रा ही या मोहिमेचाच भाग असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी बुधवारी दिली.

‘आमचं ठरलंय’ असे सांगून भाजपबरोबर युती निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती होणार असल्याचे सांगत प्रचाराची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, युतीत नेमका कोणता फॉर्म्युला ठरलाय याची माहिती अद्यापही बाहेर आलेली नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित बैठक होऊन लोकसभा आणि विधानसभेसाठी युती जाहीर करण्यात आली. युतीत झालेल्या चर्चेनुसार ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, असे ठरले आहे.

२०१४ मध्ये भाजपचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. ही आकडेवारी पाहता २०१९ मध्येही भाजपच्या जादा जागा निवडून येतील. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल. मात्र, अशा वेळी आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. त्याला भाजपने सहमती दिल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेनेने अचानकपणे आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आणले आहे. विशेषत: शिवसेना नेते खा. संजय राऊत त्यासाठी आघाडीवर आहेत.