आदित्य ठाकरेंचे ‘नाईट लाईफ’

Aditya Thackrey

badgeअवघ्या २९ वर्षे वयाचे शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र असल्याने त्यांना वेगळे ग्लॅमर लाभले आहे; शिवाय पहिल्याच झटक्यात आमदार आणि थेट कॅबिनेट मंत्री झाल्याने मीडियाचा फोकस त्यांना मिळतो आहे. काल त्यांच्या लग्नाची चर्चा झाली. आज ते आणू पाहात असलेल्या नाईट लाईफची चर्चा आहे.

प्रत्येक नेत्याचा स्वतःचा एक अजेंडा असतो. मुंबईतल्या अनिवासी भागातली हॉटेल, मॉल, थिएटर २४ तास उघडी असली पाहिजेत हा आदित्य यांचा जुना अजेंडा आहे. युती सरकारमध्ये असताना आदित्य तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागे लागले होते. पण फडणवीस यांनी डाळ शिजू दिली नाही. आता आपले पिताश्रीच मुख्यमंत्री झाल्याने आदित्य यांनी महिनाभरातच आपला अजेंडा मार्गी लावला. येत्या २६ जानेवारीपासून ज्यांना इच्छा असेल ते २४ तास आपला व्यवसाय करू शकतात. तसे पाहिले तर मुंबई कधीच झोपत नाही असे म्हटले जाते. पण मध्यरात्रीनंतर काहीशी पेंगणारी मुंबई आता २४ तास जागती राहणार आहे. लंडनमध्ये हा प्रकार लोकप्रिय आहे.

तिथे मार्केटिंगपासून सारीच मजा लोक रात्रीच एन्जॉय करतात. कारण तिथल्या लोकांना दिवसा कशाला वेळच मिळत नाही. आपल्याकडे नोकरदार सोडले तर इतर लोकांकडे भक्कम वेळ असतो. त्यामुळे नवलाई म्हणून काही दिवस हॉटेल, दुकाने चालतील. पण रात्री १२ वाजेनंतर कुणाला भूक असणार आहे? मूठभर लोकांची ती गरज असेल. नवश्रीमंत, तरुण वर्ग ही संकल्पना किती उचलून धरेल ह्यावर ह्या योजनेचे यशापयश अवलंबून असणार आहे. आपल्याकडे दिवसाही लूटमार, दरोडे असे प्रकार होतात. मग रात्री सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल.

प्रत्येक हॉटेल आणि मॉलमध्ये सरकार पोलीस बंदोबस्त देणार आहे काय? रात्री अडकलेल्या तरुणींच्या अडचणीचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांची कमतरता नाही. निर्भयासारखी प्रकरणे झाली तर सरकारची बदनामी होण्याचा धोका आहे. वाईट धंदे वाढणार नाहीत याची काळजी कोण घेईल? रात्री काही लोकांना रोजगार मिळेलही. पण रोजगारवाढीसाठी ‘रात्रीची मुंबई’ हा एकच उपाय सरकारला सुचला का? ‘रात्रीचा दिवस’ करून घेण्याच्या नादात सरकार हात पोळून तर घेत नाही ना?