भ्रष्ट ठेकेदाराशी आदित्य ठाकरेंची चर्चा, मनसेने दिले आव्हान

Aditya Thackeray-Raj Thackeray

ठाणे : ठाण्यात थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पितळ खुद्द सत्ताधारी शिवसेनेनेसह विरोधकांनी उघडे पाडले. त्यानंतर प्रशासनानेदेखील याची चौकशी करून त्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र असे असतांनाही कलादिर्ग्दशकाने उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर शिवसेनेचे युवानेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंशी गुफ्तगू केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यामुळे या घोटाळ्याचे काय झाले, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

ठाण्यातील घोडबंदर भागात थीम पार्कमध्ये उभारलेले पुतळे आणि इतर कलाविष्कारांवर १६ कोटींचा खर्च केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनीच सुरुवातीला याला आक्षेप घेण्यात आला होता. तसेच बॉलीवूड पार्कसाठी २० कोटींचा खर्च करण्यात येणार होता. परंतु, अर्धवट काम असताना पालिकेने संबंधित ठेकेदाराला ८ कोटींचे बिलही अदा केले होते. यावरूनदेखील वादंग होऊन प्रसिद्ध कलादिग्दर्शकावरही आक्षेप घेतला होता. संबंधित ठेकेदाराकडून हा खर्च वसूल करावा अशी मागणीही यावेळी झाली होती. परंतु, शिवसेनेची सत्ता असतानाही पालिका स्तरावर लावलेल्या समितीच्या चौकशीचे काय झाले याचे उत्तर अद्यापही मिळू शकलेले नाही.

दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर मनसेने आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे तुम्ही खरे कलाप्रेमी आहात म्हणून ठाण्यात आलात. मात्र, खरी आर्ट तुम्हाला पाहायची असेल तर तुमच्याच नगरसेवक, आमदारांच्या कृपेने झालेले ३६ कोटी रुपये खर्च करून बांधलेले थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कला एकदा भेट द्याच, असे आव्हान मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केले आहे. या भेटीतून ठाण्यात नक्की काय ‘करून दाखवले’ आहे याचा अंदाज तुम्हाला येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महिलांच्या प्रश्नांवरून मनसेचा आदित्य यांना टोला