शिवाजी पार्कचे काम रोखण्यासाठी मनसेने उडी घेताच, आदित्य ठाकरे म्हणतात…घाई करा

मुंबई : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क नूतनीकरण (Shivaji Maharaj Park renovation) प्रकल्पाचे काम मनसेकडून (MNS) रोखण्यात येऊ शकते याची चाहूल लागताच शिवसेनेकडून प्रकल्पासाठी निविदा काढण्याची लगबग सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका (Mumbai Mahanagar palika) अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे. शिवाजी पार्क नूतनीकरणाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया थांबवण्याची विनंती त्यांनी केली, दुसरीकडे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई शिवसेना आणि प्रशासन करताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क प्रकल्पाबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कच्या मुद्यावरुन आता शिवसेना-मनसे आमने सामने येणार आहेत.

तर दुसरीकडे, शिवतीर्थाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वापरले जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करत असल्याचं आपल्याला समजलं. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करु नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर फंड) मधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली.

तसेच आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया थांबवा, यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER