इतिहासावर किती दिवस बोलणार? – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray - sanjay raut

मुंबई : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिलाच निर्णय मुंबईच्या नाईट लाईफसाठी घेतला आहे. याविषयी विरोधकांनी गैरसमज निर्माण करून नाईट लाईफबद्दल चुकीचा आरोप विरोधक करत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. त्याविषयीचे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना दिले. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावर विचारले असता, सावरकरांबद्दल संजय राऊत यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच, इतिहासातच आपण किती दिवस रमणार आहोत! देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे ते सारेच रत्न होते. त्या सर्वांचाच आदर कायम असेल; परंतु आता देशातील वाढती बेरोजगारी, घटलेला जीडीपी, देशाची आर्थिक स्थिती या विषयांकडे लक्ष केंद्रित करायला हवे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?
‘भारतरत्न’साठी विरोध करणारे कुणीही असो, त्यांना सावरकरांच्याच कोठडीत दोन-दोन दिवस ठेवा, असा घणाघात आज खा. संजय राऊत यांनी एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यास विरोध केला आहे, हे येथे उल्लेखनीय.

नाईट लाईफ म्हणजे काय?- आदित्य ठाकरे सांगतात
नाइट लाईफविषयी कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. येथे गरिबातील गरीब व्यक्ती ते गर्भश्रीमंत व्यक्तीही वास्तव्यास आहे. दिवसभर लोक नोकरीमध्ये व्यस्त असतात. त्या अनेकांना रात्रीच निवांत वेळ असतो. अशा लोकांची दैनंदिन गरजेची कामे अडू नये. खरेदी, नाइट वॉक अशा वेळी अडचणी येऊ नये म्हणून रात्रीही मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चहा टपरीपासून ते मॉल्सपर्यंत सर्व दुकानांना रात्री सुरू ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्या पर्यटनमंत्र्यांनी घेतला आहे.

संजय राऊत यांचा काँग्रेसवर ‘हल्लाबोल’; ‘त्यांना’ सावरकरांच्याच कोठडीत ठेवा!