
जन आशीर्वाद यात्रा ही कोणाला आमदार बनवण्यासाठी काढलेली नाही. तर नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी काढलेली आहे. या यात्रेच्या निमित्ताने घराघरांत पोहचून, गावागावांत जाऊन जनतेशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे. नवा महाराष्ट्र हा बेरोजगारीमुक्त, कर्जमुक्त, प्रदूषणमुक्त, दुष्काळमुक्त, सुरक्षित आणि सुशिक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे. हे एकट्याचे काम नाही.
त्यासाठी तुमची साथ गरजेची आहे, असे भावनिक आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलिबाग येथील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात केले. राज्यातील इतर पक्ष हे निवडणुकीसाठी काम करतात. निवडणूक आली की त्यांचे नेते गावागावांत मत मागायला जातात. पण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो कायम जनतेसाठी कार्यरत असतो.
अडल्यानडल्याला मदत करतो. मदत करताना त्याची जात, धर्म अथवा पक्ष पाहात नाही, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच आदित्य यांनी भाजप सरकारच्या कर्जमुक्ती धोरणांवर बोलताना राज्यात कर्जमुक्ती योग्य प्रकारे झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणार नाही तोवर शिवसेना गप्प बसणार नाही, असे आदित्य यांनी स्पष्ट केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने राज्यातील विविध भागांचा दौरा केला. या वेळी फिरताना कर्जमुक्ती योग्य प्रकारे झाली नाही. अशा अनेक तक्रारी समोर येत आहोत. आम्ही त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा शिवसेना रस्त्यावर उतरली.
मुंबईकरांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. या मोर्चानंतर विमा कंपन्यांना जाग आली. १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मिळाले हा शिवसेनेचा दणका आहे. अशीच भूमिका शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठीही शिवसेना घेणार असल्याचे आदित्य यांनी यावेळी सांगितले.