पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

मुंबई : मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह (param bir Singh) यांची भेट घेतली आहे.

तब्बल अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ त्यांनी पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गुरुवारी (२५ फेब्रुवारी) रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते. आता या गाडीबाबत मोठी माहिती पुढे आली आहे. ही गाडी चोरीची असल्याची माहिती आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भेटीला गेले आहेत.

जी गाडी अंबानी यांच्या बंगल्याच्या बाजूला पार्क करण्यात आली होती त्यातून कोणीही बाहेर पडताना सीसीटीव्हीत दिसत नाही. गाडीत बसलेली व्यक्ती ही ड्रायव्हरच्या बाजूने न उतरता गाडीच्या आतूनच मागच्या सीटवर गेली आणि तिथून फुटपाथच्या बाजूला उतरल्याने सीसीटीव्हीत सदर व्यक्ती दिसू शकली नाही.

गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून त्याची पडताळणी केली जाते आहे. गाडीतील व्यक्ती ही मागच्या सीटवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या फुटपाथवर उतरली आणि झुकत झुकत पुढे निघून गेल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER