उद्धव ठाकरेंचा मुलगा आहे, धक्का वगैरे घेत नाही : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray-Uddhav Thackeray

मुंबई : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईंशी’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे . ‘प्रत्येक घटनेकडं शांतपणे पाहणाऱ्या व त्यावर संयमी प्रतिक्रिया देणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुलगा आहे. त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीचा धक्का वगैरे बसत नाही,’ असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले .

गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सर्व आमदारांशी संवाद साधला. यावेळी ‘रॅपिड फायर’ फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या हजरजबाबी उत्तरं दिली आणि उपस्थितांची मनं जिंकून घेतली.

अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेतली तेव्हाचा धक्का मोठा होता की संजय राऊत लीलावतीमध्ये दाखल झाल्याचा? या प्रश्नावर आदित्य यांनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिलं. ‘उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्यानं मी कुठल्याही गोष्टीचा धक्का घेत नाही. त्यामुळं मला या दोन्ही घटनांचा धक्का बसला नाही. शिवाय, आमची मैत्री पक्की असल्यानं धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. धक्का बसलेले विधानभवनात आमच्या समोर आहेत,’ अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे .

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन नेत्यांपैकी कोण अधिक जवळचं आहे, या प्रश्नावरही आदित्य ठाकरे यांनी अत्यंत हुशारीनं उत्तर दिलं. ‘महाविकास आघाडीसाठी सध्या हे दोन्ही नेते जवळचे आहेत,’ असं ते म्हणाले. या कार्यक्रमात आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी हे युवा आमदार सुद्धा यावेळी उपस्थित होते.

माझे बाबा माझेच नाही, तर अनेकांचे हिरो : धीरज देशमुख