आदित्य ठाकरे यांच्याकडून कोल्हापूरच्या प्लास्टिक मुक्तीचे कौतुक

कोल्हपूर : कोल्हापूर शहर 31 मार्च 2020 पर्यंत प्लॅस्टीक मुक्त करणेबाबत आराखडा आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना सादर केला. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल टिकिकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई रविंद्रम उपस्थित होते. यावेळी ना. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर शहर 31 मार्चपर्यंत प्लॅस्टीक मुक्त होणार असल्याने समाधान व्यक्त केले. यासाठी शहरवासीयांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे, त्यामुळे आपले शहर नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात आघाडीवर रहावे असे आवाहन केले.

या आराखडयामध्ये शहरातील संपुर्ण शाळा, महाविदयालय, विविध तालीम मंडळे, रहिवासी सोसायटी,याठिकाणी जावून प्लास्टिक तसेच थर्माकॉल वापर प्रतिबंध करणेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. प्लास्टिक वेचा मोहिम शहरातील सर्व शाळा, महाविदयालय रूग्णालये, कार्यालये, मंदीरे, व्यावसायिक क्षेत्र, बस स्टॅण्ड, बाजार पेठ, निवासी क्षेत्र, चित्रपट गृहे, रस्ते, फुटपाथ, आजूबाजुचा परीसर, रंकाळा तलाव, नदीघाट परीसर, पर्यअन स्थळे, बागा, झोपडपट्टी याठिकाणी राबविण्यात येणार आहे.शहरवासीयांच्या सहभागातून प्लॅस्टिक मुक्ती करण्याचा महापालिकेचा प्रयत्न करण्यात येणार आहे.