सहसा मी प्रत्युत्तर देत नाही पण.., माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी ही अपेक्षा नाही – आदित्य ठाकरे

Devendra Fadnavis-Aditya Thackeray

मुंबई : “देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, असं म्हटलं होतं. त्याला आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विधानासाठी माफी मागावी अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे.


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

माजी आमदार वारिस पठाण यांच्या 100 कोटी विरुद्ध 15 कोटीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीसांनी शिवसेनेला घेरलं होतं. आमचा हिंदू समाज सहिष्णू आहे, मात्र त्याला आमची दुर्बलता समजून असा कोणी लावारीस बोलत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही.

“शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, खरं म्हटलं तर बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिला कार्यकर्त्यांना आवडत नाही आणि म्हणून मी तो वापरणार नाही. मात्र, शिवसेना मूग गिळून बसली असेल, तरी आम्ही मूग गिळून बसणार नाही”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण भाजप शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान सहन करणार नाही. कोण आहे तो वारिस की लावारिस? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.