आदित्य ठाकरे पडू शकतात ?

Badgeशिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे विक्रमी मतांनी निवडून येतील असेच उभ्या महाराष्ट्राला वाटते. पण ह्या राज्यात एक व्यक्ती अशी आहे की, जिला शंका आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्या वक्तव्याने सारेच चक्रावले आहेत. आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करण्याचे सुरु आहे त्याबाबत मीडियाने छेडले होते. ‘आधी निवडून तर येऊ दे’ असे निलेश म्हणाले. अर्थात राणेंच्या ह्या मुलाकडून सकारात्मक उत्तर आले असते तर ते आश्चर्य असते. निवडणुकीत काहीही होऊ शकते. इंदिरा गांधी पडतील असे कुणाला वाटले होते? राजनारायण ह्या सारख्या सामान्य नेत्याने त्यांना हरवले होते. पण त्या वेळची हवा वेगळी होती. आजची हवा वेगळी आणि बोलकी आहे. त्यामुळे आदित्य हजार टक्के येणार.

ही बातमी पण वाचा:- अजित पवारांना डावललं जातंय?

नारायण राणे यांची प्रतिमा आक्रमक आणि स्वाभिमानी नेता अशी आहे. त्यांना मुलं आहेत. मोठा निलेश आणि धाकटा नितेश. दोघेही राजकारणात आहेत. निलेश लोकसभा निवडणुकीत पडले. नितेश विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर कोकणातल्या कणकवली मतदारसंघातून लढत आहेत. राणेंप्रमाणेच दोन्ही मुलं आक्रमक स्वभावाची आहेत. नारायण राणेंनी हवा पाहून नमते घेतले. शिवसेना-काँग्रेस आणि आता भाजपचा झेंडा हाती घेण्यासाठी ते आतुर होते.

भाजपने मागेच त्यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवले. पण मुलांचा हिशोब झाला नव्हता. शिवसेनेशी बोलूनच निर्णय करिन असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आता उद्धव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दिली असेल अशातला भाग नाही. मुख्यमंत्री योग्य मुहूर्ताची वाट पाहत होते. आज तो मुहूर्त मिळाला आणि नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचे जमले. पण त्यासाठी त्यांना आपला ‘स्वाभिमान’ भाजपात विलीन करावा लागला. आक्रमक नितेश यांना ‘शिवसेनेविरुद्ध बोलणार नाही ‘ असे जाहीर करावे लागले. पण मोठा मुलगा नितेश यांनी वेगळा सूर लावल्याने सारे आलबेल असल्याचे चित्र नाही.

कणकवली ही अशी एकमेव जागा आहे, की जिथे महायुती मोडीत निघाली आहे. भाजप आणि शिवसेना यांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे आहेत. सध्यातरी निवडणूक शांततेत असली तरी काहीही होऊ शकते. म्हणून की काय, मुख्यमंत्र्यांनी राणे कुटुंबाला सबुरी आणि शिस्त पाळण्याचा सल्ला दिला. पण भाजपच्या शाळेत ही मुलं टिकवताना मुख्यमंत्र्यांची कसोटी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राणे कुटुंबाला घरात घेतले असले तरी शिवसेना उमेदवाराच्या बाबत बोलायचे त्यांनी टाळले. मुख्यमंत्री राणे आणि उद्धव ह्या दोघांनाही दुखवू इच्छित नाहीत. त्यात त्यांचे राजकारण आहे.

मुख्यमंत्र्यांना कोकणात भाजप वाढवायची आहे. त्यासाठी ते राणेंना हाताशी धरत आहेत. कोकणात भाजप वाढणे म्हणजे शिवसेना कमी होणे. म्हणून की काय, उद्धव ठाकरे राणेंना माफी द्यायला अजून तरी राजी नाहीत. उद्या उद्धव कोकणात येत असून आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. शिवसेनेने स्वीकारल्याशिवाय राणेंचा भाजपप्रवेश पूर्ण होऊ शकत नाही. कारण युतीत चालायचे म्हटले तर कसरत आहे.