आदिती झोपण्यापूर्वी आठवणीने हे काम करते

Aditi Sarangdhar

सुंदर आणि नितळ त्वचा प्रत्येकीला हवी असते. त्वचेची काळजी घेण्याच्या हजारो टिप्समध्ये एक सल्ला आवर्जून दिला जातो आणि तो म्हणजे, दिवसभर जर काही कारणाने तुम्ही मेकअप केला असेल तर कितीही कंटाळा आला तरी रात्री झोपण्यापूर्वी तो मेकअप स्वच्छ करा. याच विषयावर सोशलमीडियावर कित्येक व्हिडिओ आहेत पण सेलिब्रिटी कलाकार त्यांच्या त्वचेचं रहस्य सांगतानाही मेकअप क्लिन केल्याशिवाय आम्ही झोपत नाही असं नेहमीच सांगतात. अभिनेत्री आदिती सारंगधरदेखील (Aditi Sarangdhar) झोपण्यापूर्वी एक काम अगदी न विसरता आणि अगदी आवडीने करते. ते काम म्हणजे चेहऱ्यावरचा मेकअप स्वच्छ केला तरी झोपण्यापूर्वी ती गडद रंगाचं लिपस्टीक लावूनच झोपते. आदितीची ही सवय गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे आणि लिपस्टिक लावून झोपलं की तिला फ्रेश वाटतं असं तिचं या सवयीवरचं म्हणणं आहे. एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आदितीला नटायला किती आवडतं या प्रश्नावर उत्तर देताना तिचं हे सिक्रेट फोडलं आणि तिच्या या हटके सवयीला तिच्या चाहत्यांनीही मनमुराद दाद दिली आहे.

विविध नाटकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर आदितीने सिनेमांमध्येही नजीब आजमावलं. मालिकांमध्येही आदितीच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या आहेत.

तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा आदिती सारंगधर हे नाव छोट्या पडद्यावर झळकलं आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत सध्या आदिती साकारत असलेली मालविका खानविलकर ही भूमिका गाजतेय. आजपर्यंत गुणी मुलगी, काळजी घेणारी सून अशा सकारात्मक भूमिका करणाऱ्या आदितीने या मालिकेत पहिल्यांदाच खलनायिका साकारली आहे आणि काही दिवसातच मालविकाचा राग राग करणाऱ्या प्रेक्षकांची वाढती संख्या हेच सांगतेय की आदितीने या भूमिकेत बाजी मारली आहे. नुकताच तिच्या या भूमिकेला लोकप्रिय खलनायिका हा पुरस्कारही मिळाल्याने सेकंड इनिंगमध्ये आदिती खुश आहे.

तर आदितीला झोपतानाही अप टू डेट असावं असं वाटतं आणि म्हणून ती केस छान विंचरून, लिपस्टीक लावूनच सगळ्यांना गुडनाइट म्हणते. दिवसभर शूटिंगच्या निमित्ताने मेकअप करावाच लागतो. पण इतर वेळीही जरी घरीच थांबायचं असलं तरी आदिती नीट आवरूनच असते. आदिती सांगते, मला लहानपणापासूनच अजागळ रहायला आवडायचं नाही. पुढे कॉलेजमध्येही व्यवस्थित लूक मेंटनेट करायला मला नेहमीच आवडायचं. अनेकदा असं होतं की बाहेर जायचं असेल तरच आवरायचं आणि घरीच थांबणार असू तर केस कसेही बांधायचे, कानात, गळ्यात, हातात काहीच घालायचं नाही. ट्राउझर आणि टीशर्ट घालून बसायचं हे नेहमीचं चित्र असतं. पण मला हे कधीच आवडलं नाही आणि पटलंही नाही. जरी शूटिंगसाठी करतो इतका हेवी मेकअप नसला तरी माझ्याकडे घरी कुणी अचानक थडकलं तरी माझे केस, चेहऱ्याचा टचअप, ड्रेस अगदी व्यवस्थित असतो. रात्री झोपतानाही मी नाइट क्रीम लावले की ओठांवर लाल, गुलाबी किंवा कोणत्याही डार्क रंगाची लिपस्टिक लावूनच झोपते. मला तो फिल खूप छान वाटतो. चेहऱ्यावर रात्रभर मेकअप ठेवण्याचे धोके मला माहित आहेत, म्हणूनच मी हा लिपस्टिक लावून झोपण्याचा पर्याय निवडला. सुरूवातीला माझ्या घरातल्यांना माझ्या या सवयीबद्दल हसू याचचं आता त्यांच्याही हे सवयीचं झालं आहे.

वीस वर्षापूर्वी जेव्हा छोट्या पडद्यावर मालिकांचं युग सुरू झालं तेव्हा आदितीला मालिकांचं तंत्र सापडलं. वादळवाट या गाजलेल्या मालिकेत आदितीने साकारलेली अॅड. रमा चौधरी ही आजही तिच्या अभिनयाने लक्षात राहते. लिमिट या नाटकापासून आदितीने रंगमंचावर आगमन केले आणि त्यानंतर मंजुळा, अगं अगं डिग्री, प्रपोझल, ग्रेसफुल आणि ऑल दि बेस्ट ही तिची नाटकं तुफान लोकप्रिय झाली. दोन वर्षापूर्वी ह. म. बने तु. म. बने या कौटुंबिक मालिकेत आदितीने गृहिणीची व्यक्तीरेखा साकारली होती. तर आता नव्या मालिकेत एक उद्योजिका, श्रीमंतीचा गर्व असलेली मुलगी आणि त्यातून आलेली खलप्रवृत्ती आदितीने उत्तम वठवली आहे. जेव्हा ही भूमिका आदितीला मिळाली तेव्हा खरंतर तिला खलनायिका साकारण्याचं टेन्शन आलं होतं, पण अभिनेत्री म्हणून तिला हे आव्हान स्वीकारावं असं वाटलं आणि या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button