लेक जिजासोबत आदिनाथ झाला इमोशनल

Adinath Kothare

एकतरी लेक यावी पोटी असं म्हणतात. घरात मुलगी असेल तर घर कसं गजबजलेलं असतं. कन्यादानाचं पुण्य तर काही वेगळंच- अशा शब्दांत नेहमीच लेकीला महत्त्व दिलं जातं. त्यात लेकीसोबत वडिलांचं नातं जरा जास्तच प्रेमाचं असतं. मुलगा आईशी कनेक्ट असतो तशी मुलगी फादर्स गर्ल असतेच. दोन दिवसांपूर्वी कन्यादिनाच्या निमित्ताने अनेक वडिलांनी आपल्या लेकीसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत या नात्याचे क्षण साजरे केले. पडद्यावरचे कलाकार जरी सेलिब्रिटी म्हणून सतत कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये चमकत असले तरी त्यांच्यातील वडील मात्र घरात चारचौघांसारखेच असतात.  त्यामुळेच कन्यादिनाच्या औचित्याने काही कलाकारांनीही आपल्या लेकीसोबत सोशल मीडियाची स्क्रीन शेअर केली. अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यालाही हा मोह आवरला नाही आणि तो लाडकी लेक जिजाला तू कधीच मोठी होऊ नको, असं म्हणत इमोशनल झाला. आदिनाथ आणि जिजाचा हा निरागस व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे.

प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा अशी ओळख असलेल्या आदिनाथनेही बालकलाकारापासून अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती ही सूत्रे सांभाळत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर हिच्यासोबत त्याचे लग्न झाले असून त्यांना तीन वर्षांची जिजा नावाची मुलगी आहे. जिजाच्या जन्मापासूनच तिच्यासोबतचे खास क्षण आदिनाथ खूप हौसेने सोशल मीडियावर शेअर करत असतो. जिजाच्या बारशाचा व्हिडीओनेही यूट्यूबवर लाखो लाइक्स मिळवले आहेत. इतकंच नव्हे तर सण-उत्सवाच्या निमित्ताने जिजाचे गोड फोटो, तिनं टाकलेलं पहिलं पाऊल, ती बोलायला लागली तेव्हाचे क्षण असा असंख्य आठवणींचा खजिना त्याच्या चाहत्यांसमोर उलगडायला आदिनाथला नेहमीच आनंद वाटतो. मुख्य म्हणजे जेव्हा आदिनाथ जिजासोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो तेव्हा त्यात कुठेही स्टारडम नसतो. अगदी घरातल्या सोफ्यावर निवांतपणे बसून जिजासोबत मजामस्ती करणारा बाप त्याच्यात दिसत असतो.

कन्यादिनाच्या निमित्ताने आदिनाथने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यामध्ये जिजा आणि आदिनाथ बापलेक म्हणून संवाद साधत असल्याचे दिसत आहे. जिजा आता चांगली बोलायला लागली असली तरी तिचे बोबडे बोल खूपच ऐकावेसे वाटतात. या व्हिडीओमध्ये जिजा विचारते, बाबा तू मोठा कधी झालास ? तेव्हा आदिनाथ तिला सांगतोय की, तू आलीस तेव्हा मी मोठा झालो; कारण मला तुझे खूप लाड करायचे आहेत. मग जिजाचा पुढचा प्रश्न खूप गोड आहे. ती म्हणतेय, मग बाबा, मी कधी मोठी होणार? कारण मलापण तुझे लाड करायचे आहेत. मुलगी मोठी होऊ नये असे प्रत्येक बाबाला वाटत असते तसे आदिनाथलाही वाटले. मग काय, आदिनाथ जिजाला म्हणतोय की, मी म्हातारा झालो की तू मोठी झालेली असशील… पण नको ना जिजा…तू मोठी नको होऊ… मग जिजा त्यावर म्हणते, मग तू म्हातारा नको होऊ. या गप्पा आदिनाथने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या आणि या संवादाचा व्हिडीओही केला.

मुली कधी मोठ्या होतात हे कळतच नाही ही भावना प्रत्येक वडिलाची असते. आदिनाथही त्याला अपवाद नाही. छोटुकली जिजा लवकर मोठी व्हावी आणि तिच्याकडून भरपूर लाड करून घ्यावेत, असे मनोमन वाटत असूनही जिजा मोठी होऊच नये अशीही भाबडी अपेक्षा आदिनाथची असल्याचे  या व्हिडीओमधून दिसत आहे.

मराठी सिनेमा, अभिनय याचे बाळकडू असलेल्या कोठारे कुटुंबात आदिनाथ मोठा झाला आहे. ‘माझा छकुला’ या सिनेमात आदिनाथ बालकलाकार म्हणून झळकला आणि त्यानंतर त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. ‘झपाटलेला’ सिनेमाच्या दुसऱ्या भागात त्याची ‘आदित्य’ ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. ‘पाणी’ या सिनेमाचे दिग्दर्शनही आदिनाथने केले आहे. कोठारे व्हिजनच्या अनेक मालिकांच्या निर्मितीची धुराही आदिनाथने सांभाळली आहे. ‘१०० डेज’ या मालिकेतही आदिनाथ दिसला होता. क्रिकेटर कपिल देव यांची बायोग्राफी असलेल्या ‘८३’ या बहुचर्चित सिनेमात आदिनाथ हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्मिती संस्थेचा प्रमुख यापलीकडे आदिनाथ जिजाचा हळवा वडीलही आहे हे त्याच्या व्हिडीओमधून त्याच्या चाहत्यांना अनुभवता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER