व्य–व्यसनांचा आणि व्यथेचा !

Mansi Fhadke

काल रखमा कामावर आली तीच बिथरलेली ! डोळे सुजलेले, डोक्यावर आलेलं टेंगूळ. काल काय झालं असणार याची कल्पना देणारे. त्यात मी तिला गरम चहा देत थोडा शांत करण्याचा प्रयत्न केला. एरवी रखमाचे आणि तिच्या नवऱ्याचे भारीच प्रेम ! कधी नवर्‍याने आणलेल्या पायातल्या साखळ्या तर कधी असंच काहीतरी उत्सुकतेने दाखवत असते. पण काल तिला म्हटलं की, “अगं तसा तुझा नवरा वाईट नाही. त्याला व्यसनाचा आजार झालेला आहे .तो एक आजारी व्यक्ती आहे. थोडं समजून घे.” तिला उपचारासंबंधी काही माहिती देणार होते; पण ती एकदम खवळून म्हटली, “कसला आजार आणि काय मॅडम, पिदाडा आहे निव्वळ ! आरडाओरडा करतो, पैशे मागतो, नाही दिले तर तर हानामारी अन् शिव्या हायच ! कमवायची तर अक्कल न्हाय .”

तर अशी ही नशा ! अनेक अर्थछटा असलेली. नशा एखाद्या मनापासून केलेल्या कामाची ही असू शकते, देशसेवेचीही अशीच असू शकते , एवढेच काय प्रेमाचीसुद्धा नशाच असते की! परंतु कार्ल युंग हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो ते खरंच की , “ती अल्कोहोल म्हणजे दारू असू दे किंवा नारकोटिक्स असू दे , अगदी टोकाचा आदर्शवाद, सगळ्याचं व्यसन वाईटच . ज्याला आपण ॲडिक्शन म्हणतो ज्या पदार्थांची डीपेंडेन्सी निर्माण होत जाते.”

व्यसनाधीन व्यक्ती कोणत्याही स्तराला जाऊन चोऱ्या करून , भीक मागून , शरीरविक्रय करून व्यसनासाठी पैसे मिळवायला लागते. व्यसनामुळे त्या व्यक्तीचे एकूणच शारीरिक,मानसिक, सामाजिक, आर्थिक, भावनिक आणि नैतिकसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होते;

पण व्यसन सोडणे तितकंसं सोपं नसतं; पण अशक्यही नसतं. व्यसन सोडता येतं! त्यावर काम करणार्‍या अनेक संस्था, दवाखाने, औषध आणि समुपदेशन पद्धती आज उपलब्ध आहेत.

आज आपण विचार करणा आहोत ते फक्त अल्कोहोलच्या व्यसनासंबंधी. अल्कोहोलीझम, हा एक मानसिक आजार आहे. याला denial चा आजार असंही म्हणतात. कारण ही व्यक्ती आपल्याला व्यसन आहे हे नाकारत असते. पण एकदा का या रुग्णाने उपचार घेण्याची गरज व्यक्त केली की मार्ग त्या मानाने सोपा होतो. अर्थात उपचारात प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा विचार करावा लागतो.

साधारण याची लक्षणे अशी आहेत :

 • बारा महिन्यांपर्यंतच्या कालावधीत सर्वसाधारण प्रमाणापेक्षा दारू जास्त प्रमाणात व जास्त वेळ पिणे.
 • दारू कमी करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणे. म्हणजे दारू पिण्याची तीव्र इच्छा होणे आणि त्यासाठी या प्रयत्नातच सगळ्या दिवसाचा वेळ खर्च होणे.
 • नशेमुळे दैनंदिन कार्यात, कार्यालयीन कामात व्यत्यय येणे, नातेसंबंधात तणाव निर्माण होणे.
 • छंद व मित्र-मैत्रिणीपासून दूर जाणे.
 • इतर आजार बीपी , शुगर, लिव्हर प्रॉब्लेम होऊनही पितच राहणे.
 • दारू सोडण्याचे प्रयत्न केल्यावर withdrawal सिम्प्टम्स दिसणे. हातापायाची थरथरी, छातीत धडधड होणे, श्वास

घ्यायला त्रास होणे, झोप न लागणे , तोंडाला कोरड पडणे यासारखे त्रास होतात. वरीलपैकी कुठलीही दोन किंवा जास्त लक्षणे अल्कोहोल डीपेंडन्सी दाखवतात. दारूमुळे नेमके शरीरांतर्गत काय घडते ?

मेंदूतील ‘प्लेजर पाथवे’मधील न्यूरॉन्स आणि आक्यूबेस व प्रिफ्रीटअल कॉर्टेक्स या भागातील पेशी दारूमुळे उत्तेजित होतात. नंतर दारूने गलुटामेट या न्यूरो ट्रान्समीटरचे प्रमाण वाढते. त्याने मेंदूचे कार्य मंदावते. स्वनियंत्रण, निर्णय क्षमता , दुःख-वेदना जाणवणं मंदावत जाते. आत्मविश्वास वाढून व्यक्ती स्वतःवरच खूश होतो. चिंतेपासून थोडा वेळ मुक्तता मिळते. आणि हेच रिसेप्टरस् पुढील व्यक्तीला दारू सतत हवी, आणखीन हवी, अशी मागणी करत राहतात. मग इच्छा असूनही थांबता येत नाही व माणूस व्यसनी बनतो.

काही प्रमाणात आनुवंशिकता, आयुष्यातील ताण सहन न होण्यासारखी मानसिक कारणं व काही प्रमाणात सामाजिक प्रतिष्ठा दर्शवण्याचा मार्ग (सोशल ड्रिंकिंग) याबरोबरच अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचाही एक
विशिष्ट पॅटर्नही दिसून येतो. एकूणच सगळ्याच व्यसनांमध्ये उपचारही एक जिकिरीची कामगिरी असते. औषधे व मानसोपचार दोन्ही करायला लागतात. यावेळी उपचारादरम्यान रुग्णावर सतत देखरेख ठेवावी लागते. आणि मानसोपचारातून दारूशिवायही आपण एक सुंदर जीवन जगू शकतो याचे आत्मभान आणले जाते. यात समुपदेशकाची भूमिका फार महत्त्वाची असते.

यासाठीची उपचार पद्धती साधारण पुढीलप्रमाणे :

१) डी टॉक्सी फिकेशन : या क्रियेमध्ये ज्याचे व्यसन असेल त्याप्रमाणे वेगवेगळी औषधे देऊन शरीरातील सर्व सबस्टन्सचा अंश बाहेर काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे विड्रॉलची लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच व्यक्तीला ऍडमिट करून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे जास्त योग्य होते; कारण या ७२ तासांच्या कालावधीत रुग्ण परत व्यसनासाठी कासावीस होत असतो.

रुग्ण घरी राहून ७२ तासांपर्यंत दारूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर होणाऱ्या त्रासासाठी लिंबू, साखर, पाणी, मीठ हे सतत देत राहावं.

२) जेव्हा रुग्णालयातून बाहेर येतो त्यावेळी आता मानसोपचारक , समुपदेशकांची जबाबदारी वाढते. ही सवय रुग्णाला का ? कशी? केव्हा लागली? याची माहिती कुटुंबीयांकडून करून घेतली जाते.

विशेषतः क्लायंटशी चांगले नाते (रेपो बिल्ट) होणे आवश्यक असते. यामुळे समुपदेशकाविषयी विश्वास निर्माण होतो. इथेच अर्धी लढाई जिंकेली जाते. कारण या नकाराच्या आजारात रुग्णाने कुणाचे तरी ऐकणे व कुणाशी तरी शेअर करणे महत्त्वाचे असते. व्यसन ही माझी सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. त्याची जबाबदारी खुद्द आपली आहे. याची जाणीव व्यसनी माणसाला होणं सगळ्यात महत्त्वाचं!

३) समुपदेशनासाठी वेगवेगळ्या थेरपीचा वापर केला जातो.

 • वर्तन उपचार पद्धतीचा वापर करताना व्यसनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे ,निरोगी आरोग्याकडे वाटचाल करण्याबाबत प्रवृत्त करणे ,औषधांमधील टाळाटाळ रोखून औषधांसाठी प्रवृत्त करणे हे काम केले जाते.
 • बोधात्मक उपचार पद्धतीद्वारे ,कोणती परिस्थिती दारू घ्यायला प्रवृत्त करते? या परिस्थितीत कसं वागायला हवं? याविषयी चर्चा होते.
 • फॅमिली थेरपीचा वापर करून घर आणि घरातील लोकांचा सपोर्ट मिळवून दिला जातो. तसेच यामुळे घरातल्या लोकांचेही गमावलेले स्वास्थ्य परत मिळवून दिले जाते.
 • ब्रीफ मोटिवेशनल इंटर्वेंशनचा वापर करून व्यसनाचे दुष्परिणाम सांगून निर्णय रुग्णावर सोपवणे. यात रिलॅक्सेशन व व्यसन यातील सीमारेषा शोधायला प्रोत्साहन दिलं जातं.
 • ग्रुप थेरपी याच्या माध्यमातून व्यसनांवर कसं नियंत्रण मिळवायचं, याच्या नव्या कल्पना रुग्णाला कळू शकतात, त्याचप्रमाणे मी एकटा नाही तर माझ्यासारखे अनेक लोक आहेत आणि ज्यांनी रोगावर नियंत्रण मिळवले आहे अशा प्रकारे प्रेरणाही मिळते.
 • एन्व्हायरमेंटल इंटर्वेंशन यातून रुग्णाला समाजाचे साहाय्य आहे हे पटवून दिलं जातं. व्यसनी माणूस उपचार घेत असताना त्यांना जाऊन भेटणं, बोलणं ,समाजाने वेगळे टाकलेले नाही ही जाणीव करून देणे हा भाग असतो.
 • Avarsion कंडिशनल थेरपीनुसार काही गोष्टींचा वापर करून दारू प्यायल्यास उलट्या होऊन रुग्ण बेजार होतो, व्यसनाला दूर ठेवतो.

एकदा का ट्रीटमेंट घेऊन रुग्ण दवाखान्यातून बाहेर पडला की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मान्यताप्राप्त ,जगप्रसिद्ध अल्कोहोलिक ॲनॉनिमस याच्या मीटिंग्स दररोज संध्याकाळी प्रत्येक शहरात असतात . त्याची माहिती करून दिली जाते. यामध्ये त्या व्यक्तीची अनामिकता राखली जाते. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य असते. ज्याचा गरजूंना खूप फायदा होतो. या प्रश्नावर आपण योग्य रीतीने काम केले तर रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय नक्कीच म्हणू शकतात, “स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा; भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी, ना आर्तता !”

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER