अदर पुनावाला हे ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराचे मानकरी

Adar Poonawala

पुणे :-सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अदर पुनावाला हे ‘एशियन ऑफ दी इयर’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कोरोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची निवड झाली आहे. सिंगापूरमधील आघाडीचे वृत्तपत्र ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’कडून हा पुरस्कार दिला जातो. आशिया  खंडातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे.

पुरस्कारात देण्यात येणाऱ्या मानपत्रात म्हटलं की, कोरोनाने (sars-cov-2) अनेक बळी घेतले आहेत. त्यामुळे जगातील जनजीवन ठप्प झाले आहे. अशा वेळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या ‘व्हायरस बस्टर्स’नी चांगले काम केले आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आमचा सलाम. या अडचणीच्या काळात त्यांनी आशिया हा आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.

‘सीरम इन्स्टिट्यूट  ऑफ इंडिया’ने  ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर ‘कोविशिल्ड’ नावाने लस विकसित केली आहे. सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात सुरू असून जगातील सर्वांत मोठी लस निर्मिती करणारी कंपनी म्हणून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पाहिले जाते. ‘आज एकही दिवस कोरोनाच्या उल्लेखाशिवाय जात नाही. आम्ही ज्यांची निवड केली आहे ते सर्वजण या सन्मानास पात्र आहेत. आशियातील सर्वांत  मोठ्या आरोग्य आव्हानाला तोंड देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’ असे ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’च्या संपादक भाग्यश्री गारेकर यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER