गरोदरपणातही काम करणाऱ्या अभिनेत्री

Anushka Sharma - Kareena Kapoor - Juhi Chawla

काम करणाऱ्या महिला गरोदर असल्या तरी त्यांना काम करावे लागते. गरोदरपणाची सुट्टी कमी असते आणि घर चालवायचे असल्याने त्यांना काम करावेच लागते. बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसच आराम करून पुन्हा नोकरीपेशा महिला कामाला लागतात. परंतु श्रीमंत महिलांचे तसे नसते. त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो त्यामुळे त्या पूर्ण गरोदरपणात आराम करू शकतात. त्यातही नायिका असलेल्यांना तर सर्व सुखे हात जोडून उभी असतात आणि त्यांनी तोंडातून शब्द काढला की त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात. त्यामुळेच करिअर बहरात असताना नायिका गरोदर होण्याचे टाळत असत. किंवा पूर्ण प्लॅनिंग करून गरोदर राहात असत. त्यांना काम करण्याची आवश्यकताही भासत नसते. मात्र बॉलिवुडमध्ये प्रथमच गरोदर असलेल्या अनुष्का शर्माने (Anushka Sharma) नुकतेच एका जाहिरातीचे शूटिंग पूर्ण केले आणि आपण गरोदरपणातही काम करीत असल्याचे दाखवून दिले.

परंतु गरोदरपणात शूटिंग करणारी अनुष्का काही पहिली नायिका नाही. यापूर्वी अनेक नायिकांनी गरोदरपणात सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

जया भादुरीने (Jaya Bhaduri) अमिताभसोबत लग्न केले तेव्हा अमिताभ स्ट्रगल करीत होता आणि जया स्थापित नायिका होती. 1973 ला या दोघांनी लग्न केले होते. त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे 1975 ला जया भादुरी गरोदर राहिली. गरोदरपणानंतर जयाने अनेक चित्रपट नाकारले होते. परंतु गरोदर राहाण्यापूर्वीच जयाने जी. पी. सिप्पींचा महत्वाकांक्षी सिनेमा ‘शोले’ साईन केलेला होता. सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आणि जया भादुरी गरोदर राहिली. सिनेमाचे शूटिंग जेव्हा जयाने पूर्ण केले तेव्हा ती तीन महिन्यांची गरोदर होती.

बॉलिवुडमध्ये (Bollywood) आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर श्रीदेवीने (Sridevi) क्रमांक एकचे स्थान प्राप्त केले होते. तिच्याकडे सिनेमांची रांग होती. बोनी कपूरबरोबर 2 जून 1996 ला लग्न केले. लग्न केले तेव्हा श्रीदेवीकडे अनेक सिनेमे होते त्यामुळे लग्नानंतर लगेचच तिने काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु काही महिन्यातच श्रीदेवी गरोदर राहिली. पहिल्या गरोदरपणाच्या वेळेस श्रीदेवीने ‘जुदाई’ सिनेमामध्ये काम केले. त्यानंतर लगेचच 6 मार्चला जान्हवीचा जन्म झाला. जुदाईचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मात्र श्रीदेवीने एकाही सिनेमाचे शूटिंग केले नव्हते. एवढेच नव्हे तर नवीन सिनेमाही साईन केला नव्हता.

आमिरसोबत ‘कयामत से कयामत तक‘ सिनेमातून रुपेरी पडद्यावर आलेल्या जुहीनेही यशाचे शिखर गाठलेले होते. यशाच्या शिखरावर असतानाच जुहीने (Juhi Chawla) लग्न केले. त्यावेली जुहीकडेही काही सिनेमे होते. जुही पहिल्यांदा गरोदर होती तेव्हा तिने ‘एक रिश्ता’ आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. एवढेच नव्हे तर जुही दुसऱ्यांदा जेव्हा गरोदर राहिली होती तेव्हा तिने ‘झंकार बीट्स’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. दोन्ही गरोदरपणात सिनेमात करणारी जुही चावला एकमेव अभिनेत्री असावी.

सावळा रंग असतानाही काजोलने (Kajol) बॉलिवुडमध्ये यश मिळवले आणि ऐन बहरात असतानाच तिने अजय देवगणसोबत 1988 मध्ये लग्न केले. अजयसोबत काजोलने लग्न केल्याने अनेकांचा आश्चर्याचा धक्का बसला होता. दुसऱ्या मुलाच्या म्हणजे युगच्या वेळेस गरोजर असताना काजोलने मित्र करण जोहरच्या ‘वुई आर फॅमिली’ सिनेमा केला होता. तसेच याच दरम्यान ती पति अजय देवगणसोबत ‘टुनपुर की हीरो’ सिनेमातही काम करीत होती. या दोन्ही सिनेमाचे शूटिंग काजोलने गरोदरपणातच केले होते.

प्रख्यात कोरियोग्राफर आणि नंतर दिग्दर्शक झालेल्या फरहा खाननेही (Farah Khan) गरोदरपणात चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. फरहा खानने शिरीष कुंदरसोबत 2004 मध्ये लग्न केले होते. त्याचवर्षी फरहाने शाहरुख खानसोबत मैं हूं ना सिनेनाचे दिग्दर्शन करीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यामुळे नंतर जेव्हा फरहा खानने शाहरुख खानला ओम शांती ओमचे कथानक ऐकवले तेव्हा शाहरुख लगेचच या सिनेमासाठी तयार झाला होता. तीन साडे तीन वर्षानंतर या सिनेमाचे काम सुरु झाले. शूटिंग सुरु असतानाच फरहा गरोदर होती. गरोदरपणातच फरहाने सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आणि त्यानंतर 2008 मध्ये तिने एक दोन नव्हे तर तिळ्यांना जन्म दिला होता.

नंदिता दासनेही (Nandita Das) 2011 मध्ये गरोदर असताना दिग्दर्शक ओनिरचा ‘आय अॅम’ सिनेमा केला होता. कोंकणा सेन शर्मानेही 2010 मध्ये गरोदरपणाच्या काळात ‘राईट या राँग’ आणि ‘मिर्च’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते.

दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या करीना कपूरनेही (Kareena Kapoor) आमिर खान सोबतच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाचे काम केले आणि दोन-तीन जाहिरातींचेही शूटिंग पूर्ण केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER