बाप आणि मुलाबरोबर पडद्यावर रोमांस करणाऱ्या नायिका

actress work as heroin with father and son

बॉलिवूडमध्ये नायिकांची कारकिर्द लवकर संपुष्टात येते. या नायिकांचे जरा वय झाले की त्या इंडस्ट्रीतून बाहेर जातात आणि त्यांची जागा नवीन तरुण नायिका घेतात. त्यामुळेच पन्नाशी पार केलेल्या नायकाला 24-25 वर्षांची नायिकाच लागते. फार क्वचित पस्तीशी चाळीशी पार केलेल्या अभिनेत्रींना नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळते. मात्र बॉलिवूडमध्ये अशाही काही नायिका होऊन गेल्या आहेत ज्यांना बाप आणि मुलाबरोबर पडद्यावर रोमांस करण्याची संधी मिळाली. यातही काही नायिकांनी अगोदर मुलाची आणि नंतर बापाचीही नायिका म्हणून काम केले आहे. मुलानंतर बापाची नायिका होण्याची संधी क्वचितच कोणाला तरी मिळते. आपण आज अशाच काही नायिकांची माहिती घेणार आहोत ज्यांनी बाप आणि मुलाबरोबर पडद्यावर नायिकेची भूमिका साकारली आहे.

या यादीत माधुरी दीक्षितचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल. मधुबालासारख्या सौंदर्याने नटलेल्या माधुरीने चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले. अनेक वर्ष ती यशाच्या शिखरावर होती. आजही तिची जादू कायम आहे. माधुरीने बाप बेट्यांबरोबर नायिकेची भूमिका साकारून एक वेगळा विक्रम केला होता. माधुरीने सर्वप्रथम 1988 मध्ये दयावान चित्रपटात विनोद खन्नाच्या नायिकेची भूमिका केली होती. या चित्रपटात या दोघांचे चुंबनदृश्यही होते जे प्रचंड गाजले होते. त्यानंतर दहा वर्षानंतर म्हणजे 1997 मध्ये विनोद खन्नाचा मुलगा अक्षय हिमालयपुत्रमधून रुपेरी पडद्यावर नायक म्हणून आला. त्याचवर्षी मोहब्बतमध्ये माधुरीने अक्षय खन्नाची नायिका म्हणूनही काम केले होते.

माधुरीने ऋषी कपूरसोबत प्रेमग्रंथ, याराना आणि साहिबां चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली होती. यानंतर माधुरीने ऋषी कपूरचा मुलगा रणबीरकपूरसोबत यह जवानी है दीवानीमधील घागरा गाणे केले होते जे प्रचंड लोकप्रिय झाले होते.

त्या काळात माधुरी आणि श्रीदेवीमध्ये क्रमांक एकसाठी लढाई सुरु होती. ज्याप्रमाणे माधुरीने पिता-पुत्रासोबत काम केले अगदी तसेच श्रीदेवीनेही पिता पुत्रासोबत नायिकेची भूमिका साकारली आहे. मात्र माधुरीने अगोदर पिता आणि नंतर मुलाबरोबर काम केले तर श्रीदेवीने अगोदर मुलाबरोबर आणि नंतर त्याच्या बापाच्या नायिकेची भूमिका साकारली. श्रीदेवीने 1989 मध्ये चालबाज चित्रपटात सनी देओलच्या नायिकेची भूमिका साकारली होती. त्यानंतर श्रीदेवीने सनीचा पिता धर्मेंद्रसोबत फरिश्ते, नाकाबंदी, सोने पे सुहागा, वतन के रखवाले, सल्तनत आणि जानी दोस्त चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली.

श्रीदेवी आणि जयाप्रदामध्येही क्रमांक एकच्या पदासाठी चांगलीच चुरस होती. जयाप्रदानेही धर्मेंद्र आणि सनी देओलच्या नायिकेची भूमिका साकारली आहे. धर्मेंद्रसोबत जयाप्रदाने जबरदस्त चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 1993 मध्ये जयाप्रदाने वीरता चित्रपटात सनी देओलच्या नायिकेची भूमिका केली होती. खरे तर जयाप्रदा सनीच्या नायिकेची भूमिका करण्यास तयार नव्हती पण केवळ धर्मेंद्रच्या सांगण्यामुळे जयाप्रदाने वीरतामध्ये काम केले. याचे कारण म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेंद्रचा भाऊ अजित सिंह देओल करणार असल्यानेच धर्मेंद्रने जयाप्रदाला सनीची नायिका बनण्यास तयार केले होेते.

माधुरीप्रमाणेच डिंपल कपाडियानेही विनोद खन्नासोबत खून का कर्ज आणि इंसाफ चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली होती तर दिल चाहता है मध्ये अक्षय खन्नाच्या नायिकेची भूमिका साकारली होती.

श्रीदेवीप्रमाणेच अमृता सिंह ने प्रथम सनी देओलच्या नायिकेचे काम केले होते. बेताब चित्रपटातून धर्मेंद्रने सनी आणि अमृताला लाँच केले होते. त्यानंतर अमृता सिंहने सच्चाई की ताकत चित्रपटात धर्मेंद्रच्या पत्नीचे काम केले होते.

हेमा मालिनी नेही राजकपूरच्या नायिकेच्या रुपात सपनों का सौदागर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. त्यानंतर हेमा मालिनीने राज कपूरच्या मुलांसोबत म्हणजेच रणधीर कपूरसोबत हाथ की सफाई आणि ऋषी कपूरसोबत एक चादर मैलीसी चित्रपटात नायिकेची भूमिकाही साकारली होती.

शिल्पा शेट्टीनेही अमिताभ बच्चनसोबत लाल बादशाहमध्ये नायिकेची भूमिका साकारली तर अभिषेक बच्चनसोबत फिर मिलेंगे आणि दसमध्ये काम केले होते.

शिल्पाबरोबरच राणी मुखर्जीनेही प्रथम अभिषेकसोबत बस इतना सा ख्वाब है, बंटी और बबली, युवा, कभी अलविदा ना कहना चित्रपटात नायिकेचे काम केले होते. तर नंतर अमिताभ बच्चनसोबत ब्लॅक चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील या दोघांचे चुंबनदृश्य चांगलेच गाजले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER