कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणावं… राजू शेट्टी संतापले

Kangana Ranaut - Raju Shetti

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्या मनात सध्या काय चालले आहे हे तिच्या वक्तव्यावरून तरी नक्की लक्षात येण्यासारखे नाही. एरवी आपल्या कामाशी काम ठेवणाऱ्या कलाकारांनी सामान्य माणसांच्या जीवनात अशी टीकास्त्र ढवळाढवळ करावी हे क्वचितच घडतं. त्यात कंगना रणौतची आता हाईट झाली आहे. तिने देशाच्या पोशिंद्याला दहशतवादी म्हटले आहे.

तिच्या या वक्तव्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील.” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी कंगनाचा समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, “शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर हिमाचलप्रदेशसारख्या एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीनं बोलणं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो ! कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडे म्हणावं की काय म्हणावं यासाठी मला शब्द सुचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं तरी याच शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत. तुमचे काचेचे मनोरे क्षणात उद्ध्वस्त होतील. हा दिवस फार लांब नाही. ” असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

“पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश किंवा तेलंगणा असेल या ठिकाणी शेतकरी त्याच्या न्याय्य हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला सरकारने मान्य केलेला हमी भाव मिळणं हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा-आकांक्षांचा चक्काचूर झाला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रणौतसारख्या एका नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही.” असं शेट्टी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER