चाळीशीही गाठू न शकलेल्या नायिका

बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम करणाऱ्यांना पैशांची कमतरता नसते. कलाकार कोट्यावधी रुपये कमवत असतात. त्यामुळे एखादा आजार झाला तर अगदी परदेशात राहूनही महिनो न महिने उपचार घेण्याची कलाकारांची ऐपत असते. असे असले तरी बॉलिवूडमध्ये अशा अनेक नायिका आहेत ज्या आजारपणामुळे म्हणा वा जीवनात आलेल्या कटु प्रसंगामुळे आत्महत्या केली. चाळीशी गाठण्याच्या आधीच या नायिकांनी बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावरून एक्झिट घेऊन देवाघरच्या प्रवासाला सुरुवात केली.

प्रचंड वैभव आणि लोकप्रियता मिळवलेल्या मात्र चाळीशीच्या आतच देवाघरी गेलेल्या नायिकांचा विचार करता सगळ्यात अगोदर जे नाव डोळ्यासमोर येते ते मधुबालाचे. मधुबालाच्या सौंदर्याबाबत काही बोलण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. दैवी सौंदर्य कसे असावे त्याचे उदाहरण म्हणजे मधुबाला. मधुबालाने रुपेरी पडदा गाजवला होता. ती एक आघाडीची नायिकाही होती. पण म्हणतात सौंदर्याला नजर लागते तसेच झाले. मधुबालाच्या हृदयाला लहानपणापासूनच एक छिद्र होते. शेवटच्या दिवसात किशोर कुमारने तिच्याशी लग्न केले होते आणि तिची पूर्ण काळजी घेत असे. आजारपणामुळे मधुबालाच्या सौंदर्यावर परिणाम झाला होता आणि तिचा चेहरा खराब होऊ लागला होता. त्यामुळे ती आरशातही बघत नसे. ती सतत मेकअप करून बसून राहायची. ती निराश होऊ नये म्हणून सगळे तिच्याशी चांगले बोलायचे आणि तिच्या रुपाची प्रशंसाही करायचे. हृदयाला असलेल्या छिद्रामुळे वयाच्या फक्त 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सौंदर्यवती मधुबालाचे निधन झाले.

मधुबालाचे जसे आजारपणामुळे निधन झाले अगदी तसेच ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख मिळवलेल्या मीना कुमारीचाही आजारपणामुळेच लवकर मृत्यू झाला. मीना कुमारीला लिव्हर सोरायसीसचा आजार झाला होता. काही कारणामुळे मीना कुमारीला दारु पिण्याची सवय लागली होती. ती का लागली याबाबत नंतर कधी तरी बोलू. विदेशी दारु पिऊन ती 24 तास नशेत असायची. तिच्या जवळचे तिला विदेशी दारु म्हणून देशी दारु ग्लासात भरून द्यायचे. नशेत असल्याने मीना कुमारीला काही कळत नसते आणि ती देशी दारु पीत असे. त्यामुळे तिचे लिव्हर संपूर्णपणे खराब झाले होते. या आजारपमामुळेच वयाच्या 39 व्या वर्षी मीना कुमारीचा मृत्यू झाला.

बॉलिवूडमध्ये स्मिता पाटीलनेही आपल्या अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. आर्ट, कमर्शियल अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये स्मिताने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली होती आणि प्रत्येक भूमिकेत ती सूट व्हायची किंवा ती भूमिका स्मिता जगायची त्यामुळे ती कधीही नाटकीय अभिनय करते असे वाटत नसे. स्मिता आणि राज बब्बरचे लग्न झाले होते. स्मिताने मुलाला जन्म दिला पण बाळतंपणात तिला काहीतरी त्रास झाला होता. त्यामुळे जवळजवळ महिनाभर स्मिता आजारी होती आणि एक दिवस तिला रक्ताच्या उलट्या झाल्या, तिचे अंग पिवळे पडले. तिला इस्पितळात नेईपर्यंत ती कोमात गेली आणि काही वेळातच तिचे निधन झाले. त्यावेळी स्मिताचे वय फक्त 31 वर्ष होते.

सिल्क स्मिता दक्षिणेतील एक प्रचंड यशस्वी अभिनेत्री. अंग प्रदर्शन करण्याच्या तिच्या धाडसामुळे ती प्रचंड लोकप्रिय होती. अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. हिंदीतही सिल्क स्मिताने काही आयटम साँग केले होते. सिल्क स्मिताला सेक्स सायरन म्हणून ओळखले जात होते. तिच्या बिनधास्त अंग प्रदर्शनाच्या कामामुळे तिच्याबाबत काहीही छापून येत असे. रस्त्याने जाताना तिला अश्लील इशारेही केले जायचे. या सगळ्यांचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. तिच्या घरात ती मृतावस्थेत सापडली होती. तिने आत्महत्या केली असे म्हटले जाते. त्यावेळी तिचे वय फक्त 35 वर्ष होते.

मधुबालाप्रमाणचे दिव्या भारतीही अत्यंत सुंदर होती. अत्यंत कमी वयात तिने चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. लहान वयातच तिने हिट चित्रपट दिले होते आणि प्रचंड यश मिळवले होते. प्रख्यात निर्माता साजिद नाडियाडवालाशी दिव्या भारतीने लग्न केले होते. परंतु लग्नानंतर काही महिन्यातच दिव्याचा घराच्या गॅलरीतून खाली पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी तिचे वय फक्त 19 होते. तिचा मृत्यू आत्महत्या होती, दुर्घटना होती की हत्या होती याचा शोध अजूनही लागलेला नाही. दुर्घटना असे सांगून तिच्या मृत्यूची चौकशी बंद करण्यात आली.

काही वर्षांपूर्वी जिया खाननेही वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली. अमिताभ बच्चनसोबत ‘निशब्द’ चित्रपटातून जिया खानने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही हिट चित्रपटांमध्येही तिने काम केले. तिची कारकिर्द बहराला येत होती.

आदित्य पंचोलीच्या मुलाबरोबर सूरज पंचोलीबरोबर तिचे प्रेम जुळले होते आणि एक दिवस अचानक तिने आत्महत्या केली. तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. आजही हा खटला सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER