होय मी पाल झुरळ यांचे सुद्धा बायोपिक करेन

Subodh Bhave

निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हण आहे. काही अंशी हे खरंही आहे. जेव्हा लोक निंदा करतात तेव्हा आपलं काम चांगलं होत असतं, असा त्यातून अर्थ घेतला तर अशा निंदा-नालस्तीचा आपल्यावर काहीच परिणाम होत नसतो. सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये कलाकारांना ट्रोल केलं जातं ते निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीच्या प्रचितीसारखं आहे. बायोपिक सिनेमासाठी प्रसिद्ध झालेला अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने त्याच्या बायोपिकवरून होणाऱ्या ट्रोलिंगला असच सडेतोड उत्तर दिले आहे. होय, भविष्यात मला जर पाल, झुरळ, बेडूक यांचेही बायोपिक करायला मिळाले तर मी आनंदाने करेन असे म्हणत त्याने अनेकांची तोंडं बंद केली आहेत.

एकेकाळी नाटक सिनेमांमध्ये पैसे घेऊन काम करणार नाही. इतकच काय तर हौस म्हणूनच अभिनय करेन. करिअर म्हणून या क्षेत्राचा कधीच विचार करणार नाही असे म्हणणारा सुबोध भावे आज अभिनयक्षेत्रात इतका अढळ झाला आहे की बायोपिक म्हटलं की सुबोध भावे याचा चेहरा आणि नाव समोर येतं. लोकमान्य, बालगंधर्व, डॉक्टर काशिनाथ घाणेकर या समाजातल्या तीन वेगळ्याच व्यक्तिरेखा ताकदीने साकारत त्याने त्याच्या अभिनयाची ताकदही दाखवून दिली आहे. विनोदाने त्याच्यावर टिप्पणी देखील होते की आता सुबोध भावे फक्त त्याच्या कारकिर्दीत बायोपिकच करणार का? किंवा ज्यांना बायोपिक करायचा आहे अशा निर्माता-दिग्दर्शकांनी सुबोध भावेला साइन करावे अशा आशयाच्या अनेक कमेंट सुबोध भावेला मिळत असतात. गंमत म्हणून ठीक आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये सुबोधला अशा प्रकारच्या बायोपिकमधील अभिनयाच्या नावाने अतिशय ट्रोलिंग सहन करावं लागलं. त्याच्या सोशल मीडिया पेजवर अनेकांनी बायोपिकवरून त्याची चेष्टा केली. दुसरे काही येत नाही म्हणून सुबोध बायोपिक करत असेल असेही चिमटे नेटकऱ्यांनी काढले. मात्र सुबोध एका ठराविक मर्यादेपर्यंत शांत होता. दरम्यान सुबोधने एकदा पुण्यामध्ये राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची सुरुवात करत असताना सुबोध असं म्हणाला होता की , मला बायोपिक करायला खूप आवडतं. बायोपिकच्या निमित्ताने आपल्याला त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करता येतो. ती व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कशी होती, तिचा स्वभाव कसा होता, हे जाणून घेता येतं .अभिनेता म्हणून माझ्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला समजून घेणे हे खूप महत्त्वाचं वाटतं आणि बायोपिक करणं खरंच सोपं नाही कारण काही काळापुरतं आपण त्या व्यक्तीचे आयुष्य जगत असतो. अभिनयापलीकडे कुठेतरी ही जाणीव मला माणूस म्हणून समृद्ध करणारी आहे. राहुल गांधी यांच्या मुलाखतीची सुरुवात मी बायोपिक या शब्दाने केली आणि मी त्यांना म्हणालो होतो की मला बायोपिक करायला खूप आवडतं आणि तुमचीही बायोपिक करायला मला भविष्यात नक्की आवडेल. यासाठी ही मुलाखत म्हणजे माझ्याकरिता तुम्हाला जाणून घेण्याचा एक अभ्यास असेल. खरेतर एक मुलाखतीची वेगळी सुरुवात करायची म्हणून मी ते वाक्य बोललो होतो मात्र त्याचा विपर्यास करून सुबोध भावे राहुल गांधींची बायोपिक करणार अशी बातमी चुकीच्या अर्थाने पसरवली गेली.

त्यावरून सुबोध भावेला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समर्थकांकडून खूप चुकीचे मेसेज आले होते. या मेसेजमध्ये असही काही जणांनी म्हटलं होतं की बायोपिक सिनेमा हा निधन झालेल्या व्यक्तींवर होत असतो आणि राहुल गांधींची बायोपिक करायची आहे असे म्हणून सुबोधला गांधी राहुल गांधी हे काळाच्या पडद्याआड जायला हवे आहेत का ?अशा आशयाच्या कमेंट सुबोधपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यावर देखील सुबोधने लोकांच्या बौद्धिक कमकुवतपणाचा खरपूस समाचार घेत असं म्हटलं होतं की आपण काय बोलतो याचा जर आपल्याला योग्य अर्थ कळत नसेल तर अशा व्यक्तींनी स्वतःची प्रतिक्रिया देऊ नये. इतकेच नव्हे तर सुबोधला अभिनय क्षेत्रातील काही लोकांच्य देखील चुकीच्या कमेंट आल्या होत्या. काही काळ त्याचे सोशल मीडिया पेज हे बायोपिक विषयावरून त्याच्यावर टीका करणाऱ्या कमेंटचा भडीमार करणारं ठरलं.

यावर सुबोध व्यक्त झाला आणि म्हणाला की , बायोपिक करणं हे खरच एखादी काल्पनिक भूमिका करण्यापेक्षा खूप अवघड आहे. कोणत्याही कलाकारासाठी दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य पडद्यावर मांडणे हे अभिनेता म्हणून कस लागणारं आहे आणि मला अत्यंत अभिमान वाटतो की बायोपिक सिनेमा करण्याची संधी मला मिळाली. आयुष्यामध्ये चांगल्या संधी खूप कमी जणांच्या वाट्याला येतात आणि त्या संधीचं सोनं करण्याची संधी खूप कमी जणांना मिळते. त्या कमी जणांमध्ये कुठेतरी मी समाविष्ट होतो याचा आनंद आहे. तुम्ही फक्त बायोपिक करणार का? असं विचारणा ऱ्यांना सुबोध आवर्जून सांगतो की, हो ,केवळ माणूसच नव्हे , व्यक्तीच नव्हे तर भविष्यात जर मला किडा-मुंगी बेडूक पाल झुरळ यांची बायोपिक करण्याची संधी मिळाली तरीही त्यात मी काम करेन.

मालिका नाटक सिनेमा या तीनही माध्यमांमध्ये सुबोध भावे हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. सध्या चंद्र आहे साक्षीला या मालिकेत सुबोध ग्रे शेड असलेल्या नायकाची भूमिका करत आहे. यापूर्वी तुला पाहते रे , का रे दुरावा या मालिकांमध्ये ही सुबोधने नकारात्मक भूमिका केली होती आणि त्यांच्या या भूमिकेला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. लोकमान्य,बालगंधर्व कट्यार काळजात घुसली, अगडबम हे वेगळ्या धाटणीचे सिनेमे केले आहेत. आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर या सिनेमातील डॉक्टर काशिनाथ ही व्यक्तिरेखा सुबोधच्या अभिनयाने तुफान लोकप्रिय देखील झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER