पालिकेच्या नोटिशीविरुद्धचे अपील अभिनेता सोनू सूद याने मागे घेतले

Sonu Sood
  • मात्र पालिकेचा निर्णय होईपर्यंत कारवाई नाही

नवी दिल्ली : मुंबईतील जुहू येथील ‘शक्तिनिवास’ या आपल्या राहत्या इमारतीत नियमबाह्य फेरबदल व अतिरिक्त बांधकाम पाडून टाकण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने दिलेल्या नोटिशीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील व मुंबईच्या नगर दिवाणी न्यायालयात केलेला दिवाणी दावा अभिनेता सोनू सूद याने शुक्रवारी मागे घेतला.

सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोनू सूदतर्फे करण्यात आलेला प्रस्ताव मान्य करून त्याला अपील व मूळ दिवाणी दावा मागे घेण्याची अनुमती दिली. मात्र सोनू सूद याने संबंधित बांधकाम नियमाधीन करण्यासाठी जो अर्ज केला आहे त्यावर महापालिकेचा निर्णय होईपर्यंत कोणताही सक्तीची कारवाई केली जाऊ नये, असे स्पष्ट करून खंडपीठाने सूद यास थोडा दिलासा दिला.

सोनू सूदतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी न्यायालयास सांगितले की, हे अपील व ते ज्यात केले गेले आहे तो मूळ दिवाणी दावाही माझे अशिल मागे घेऊ इच्छितात. त्यांनी जो अर्ज केला आहे त्यावर महापालिकेने निर्णय घ्यावा. या प्रस्तावाची प्रशंसा करत सरन्यायाधीश म्हणाले, (वकिलाने दिलेल्या) योग्य सल्ल्याने प्रकरण मिटल्याचे हे विरळा उदाहरण आहे. असे फार क्वचित घडते.

यावर रोहटगी म्हणाले की, ते (सोनू सूद) बॉलिवूडचे अभिनेते आहेत. त्यांना या प्रकरणातील कायद्याच्या बारकाव्यांविषयी फारशी माहिती नाही. (सुरुवातीस) त्यांना चुकीचा सल्ला दिला गेला होता. पालिकेने काढलेल्या नोटिशीविरुद्ध सोनू सूद याने प्रथम दिवणी दावा दाखल करून त्यात अंतरिम मनाई हुकूम मिळविण्यासाठी अर्ज केला. तो फेटाळला गेल्यावर तो उच्च न्यायालयात गेला. परंतु तेथेही निकाल विरोधात गेल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात हे अपील केले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER