आरोहचा टोला..

Aaroh Welankar

ट्रोलर्सना आरोहचा (Aaroh Welankar) टोलासेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडींवर त्यांच्या चाहत्यांचे बारीक लक्ष असते. त्यांनी कुठल्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्या कार्यक्रमासाठी त्यांनी कुठले कपडे घातले, काय स्टाइल केलीय इथंपासून ते एखाद्या घटनेवर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, सोशलमीडियावर त्यांनी काय मत मांडलं आहे, कमेंट कशी केली आहे, कोणासोबत फोटो शेअर केला आहे इथंपर्यंतच्या गोष्टी फोकस होत असतात. मग काय, अशावेळी कलाकारांना ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो. कधीकधी ट्रोलिंग वाढलं तर कलाकार ती पोस्ट डिलिट तरी करतात किंवा सॉरी म्हणून विषय मिटवतात. पण अभिनेता आरोह वेलणकर मात्र ना पोस्ट काढून टाकतो ना सॉरी म्हणतो. तो ट्रोलर्सना थेट आव्हान देत टोले लगावतो.

काही दिवसांपूर्वी आरोहने (Aaroh Welankar) त्याच्या सोशलमीडियावर कोरोना साथीच्या काळात कलाकारांच्या प्रश्नांवर केलेल्या पोस्टवर ट्रोलर्सनी केलेल्या कमेंटवर असेच रोखठोक उत्तर देत गप्प बसवले. आरोहच्या पोस्टची जितकी चर्चा झाली त्याहून जास्त त्याने ट्रोलर्सना जो शाब्दिक फटका लगावला त्याचीच चर्चा रंगली.लेक मी लाडाची गं या मालिकेतून आरोह छोट्या पडद्याकडे वळला आहे. मिताली मयेकरसोबत त्याची जोडी या मालिकेत पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना आवडू लागली आहे. या मालिकेत आरोह डॉक्टर सौरभ हे पात्र साकारत असून तो पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून आरोह सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे.

एका पेजवर त्याने आजच्या मालिकांचे विषय, आजच्या तरूणाईच्या लग्नाबाबतच्या संकल्पना, आयुष्याकडे पाहण्याचा आजच्या युवकांचा दृष्टीकोन याविषयी काही मतं मांडली. अर्थात आरोहने हे स्वताच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केले. मात्र त्याच्यावर ट्रोलर्सनी त्याला भंडावून सोडले. आलेल्या कमेंटमध्ये ही पोस्ट डिलीट करा असेही काही मेसेज होते. यावरूनच आरोहच्या हे प्रकरण डोक्यात गेलं. एका रेडिओ चॅनलवर त्याची लाइव्ह मुलाखत सुरू असताना जेव्हा प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न त्याला आरजेने विचारला तेव्हा आरोहने या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि सोशल मीडियावर मतं मांडणाऱ्या कलाकारांना नेहमीच धारेवर धरणाऱ्या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. आरोह म्हणाला की आम्ही कलाकार आहोत याचा अर्थ आमची काही मतं नाहीत असा होत नाही. पडद्यावर एखादी भूमिका साकारण्यापुरते आम्ही ती व्यक्तीरेखा जगत असतो. पण त्या पलीकडे आम्ही माणसं आहोत. त्यामुळे सोशल मीडियावर जर माझे मत मी मांडले तर त्यावर चांगली चर्चा करण्यास माझी काहीच हरकत नाही, पण त्यावरून जर मलाच नव्हे तर कोणत्याही कलाकाराच्या व्यक्तीगत जीवनावर बोट ठेवले जात असेल तर ही योग्य प्रेक्षकांची लक्षणं नाहीत.

रसिक मायबाप असतात, त्यांच्या पावतीशिवाय आमचे काम अपूर्ण आहे याचा अर्थ असा नाही की प्रेक्षकांनी कलाकारांच्या मतस्वातंत्र्यावर गदा आणावी. त्यामुळे कलाकारांना समजून घेणे ही प्रेक्षकांचे, चाहत्याचेही काम आहे.आरोहच्या या उत्तराने अनेक ट्रोलर्सची बोलती मात्र चांगलीच बंद झाली.रेगे या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या आरोहने काही जाहीरातींमध्येही काम केले आहे. मार्चमध्ये जेव्हा लॉकडाउन सुरू झाले तेव्हा आरोहने लेखनातही गुंतवून घेतले होते. काही अनुभव त्याने लिहून काढले आणि ते सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. काही अॅनिमेटेड फिल्ममध्येही आरोहचा सहभाग आहे. आरोह चर्चेत आला तो बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवून.

बिग बॉसमध्ये तो शेवटपर्यंत राहिला नसला तरी त्याने त्याचा टास्क पूर्ण करत वाहवा मिळवली होती.गेल्यावर्षी राज्यात अनेक शहरांमध्ये महापूर आला होता. त्यावेळी आरोहने अनेक पूरग्रस्तांना मदतीचा हात देत कलाकारात संवेदनशील माणूस असतो हे दाखवून दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आरोहने एक लाख रूपयांची मदत केली होती. मनोरंजन क्षेत्रातील ज्या कर्मचाऱ्यांना महापुराचा फटका बसला आहे त्यांना किराणा सामान भरून देण्यातही आरोहने वाटा उचलला होता. कलाकारांचे फोटो, त्यांचे ड्रेस यावर नको त्या कमेंट करण्यापेक्षा त्यांच्या पडद्यामागच्या कामाचेही कौतुक करा असेही ट्रोलर्सना सांगायला आरोह विसरला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER