कपल चॅलेंजसारखे उपक्रम ठरू शकतात डोकेदुखी

Couples Chhalenges

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधीही, कोणताही आणि कसलाही ट्रेंड व्हायरल होऊन लोकप्रिय होतो. सध्या ‘कपल चॅलेंज’ (Couple Challenge) हॅशटॅगने नेटीजन्सना भुरळ घातली आहे. कपल चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असाल तर सावधान व्हा. कारण तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करू शकतात. एखाद्याचा संसार, आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकते. सोशल मीडियातील वापराबाबत अधिक सजगता बाळगण्याची गरज आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंजच्या नावाखाली आपला व परिवारासोबत असलेल्या फोटोला सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या ट्रेंडने गेल्या वर्षभरात अधिकच जोर धरला आहे.

नेटकऱ्यांकडून पसंतीही मिळत असल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप आदी समाजमाध्यमावर आकर्षक वेशभूषा करून फोटो अपलोड केले जात आहेत. हे चॅलेंज आपल्याला स्वीकारायचे निमंत्रण देत असतात. या अशा उपक्रमातून नेमका काय उद्देश साध्य केला जाणार आहे याचा साधा विचारही केला जात नाही. सोशल मीडियावर फोटो अपलोड करते वेळी ‘हॅश कपल चॅलेंज’ असा हॅशटॅग देण्यात येतो. त्यावर सर्च केले की, कपल चॅलेंज नावावर हजारो दाम्पत्यांचे सर्व फोटो दिसतात. सायबर गुन्हेगार तुमचे फोटो हे फोटोशॉपमध्ये एडिट करून हव्या त्या ठिकाणी वापरू शकतात.

त्यामुळे बऱ्याचदा तुमच्या चेहऱ्याने तुम्हाला फेक अकाउंटशी सामना करावा लागतो. एवढंच नाही तर तुमच्या फोटोचा कुठेही, कसाही वापर होऊ शकतो. फेक अकाउंट असेल किंवा केले की, पोर्न साईट्सवरसुद्धा हे फोटो अनेक वेळा वापरण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. असे अनेकांबाबत सायबर गुन्हे याआधीही घडले आहेत. त्यामुळे फोटो हे ‘कपल चॅलेंज’सारखे ‘सोशल’ उपक्रम स्वीकारताना आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत नाही ना याचा एकदा विचार करण्याची गरज आहे.

काय काळजी घ्याल?

  • सोशल मीडिया संबंधित अकाउंटला सोपा पासवर्ड ठेवू नये.
  • अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये.
  • अनोळखी इसमाने फोटो टाकण्यास सांगितले तर ते करू नये.
  • आपले फेसबुक अकाउंटची प्रायव्हसी सेटिंग करा.

कपल चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज, फॅमिली चॅलेंज आदी वेगवेगळ्या चॅलेंजच्या नावावर सोशल मीडियावर आपले व कुटुंबीयांसमावेत फोटो अपलोड केले जात असल्याने सायबर गुन्हेगार याचा गैरवापर करून तुमच्या भावी जीवनात अडथळा आणू शकतात. अशा प्रकारच्या विविध नागरिकांनी कोणत्याही चॅलेंजच्या नादात पडू नये, कुणीही आपले वैयक्तिक तसेच पती, पत्नी, मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत, असे आवाहन सायबरतज्ज्ञांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER